शाहरुख खानच्या जवान सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच या सिनेमाच्या प्री- बुकिंगने सगळे रेकॉर्ड्स तोडले. काहींनी थर लावत शाहरुखला सलामी दिली तर काही लोकांनी थियेटरमध्ये चक्क पैसे उडवले. पण सध्या चर्चा रंगतेय ती म्हणजे या सिनेमात शाहरुख सोबत काम केलेल्या सहअभिनेत्रींची आणि त्यात विशेष म्हणजे आपल्या मराठमोळ्या गिरीजा ओकची.
मराठी अभिनेत्री गिरीजा ओकने शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.यावेळी तिने तिचे चित्रपटातील भूमिकेबद्दलचे आणि ऑडिशनचे अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
गिरीजा ओक म्हणाली की, “मला एका वेगळ्या भूमिकेच्या ऑडिशनसाठी फोन आला होता. पण काही कारणास्तव ती भूमिका नाही तर दुसऱ्या भूमिकेसाठी मला ट्राय करूया, असा मला पुन्हा फोन आला. दिग्दर्शकाला वाटतंय की, तुला एका वेगळ्या भूमिकेसाठी घ्याव. तर मी म्हटलं, ठीक आहे. मी परत येते. त्यामुळे मी पुन्हा जाऊन दुसरी टेस्ट दिली. त्यानंतर मला पुन्हा फोन आला की, दिग्दर्शकाला तुला भेटायचं आहे.”
गिरीजा ओक म्हणाली की, “दिग्दर्शकाला मी भेटली तेव्हा त्याने मला सांगितलं की, ‘माझ्या चित्रपटात पाच-सहा मुली आहेत; ज्यांची फार इंटरेस्टिंग भूमिका आहे. त्यातल्या मला चार सापडल्या आहेत. पाचवी आणि सहावी अजून मी शोधतोय. पण अजून माझं ठरलं नाहीये की, मुली पाचच असतील की सहा असतील. कारण मी प्रत्येकांमध्ये काहीतरी शोधतोय. चार मुली अशा सापडल्या आहेत, ज्यांच्यामध्ये मला काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय. पण मला अजून दोन सापडल्या तर दोन, नाहीतर एकच. कारण एकीची भूमिका लिहिली आहे. पण जी सहावी भूमिका आहे, तिच्याबद्दल आतापर्यंत फारस काही लिहीलं नाहीये. त्यामुळे तिची भूमिका आता लिहिणार आहे आणि ती मुलगी तू आहेस. तर मग तुला अशा परिस्थितीत काम करायला आवडेल का? आता मी तुला नाही सांगू शकत की, तुझी नक्की भूमिका काय आहे? पण तुला मी हे सांगू शकतो की, या सहाजणींना भूमिका समान वाटू दिल्या आहेत. त्यामुळे आता पुढे बघूया. मला तुझी ऑडिशन आवडली. तू फार इंटरेस्टिंग वाटलीस. तर आता आपण हे डेव्हलप करू या. तुझा माझ्यावर विश्वास आहे का? अशा परिस्थितीत तुला हो म्हणायला आवडेल का? कारण मी आता तुला स्क्रिप्ट देऊ शकत नाही. त्यामध्ये टेक्निकली तुझी भूमिकाच नाहीये.”
गिरीजा ओक म्हणाली की, “यावर मी म्हणाले की, तुम्ही मला हे प्रामाणिकपणे सांगितलं, हे फार इंटरेस्टिंग वाटलं. आणि असं कितीवेळा होतं की, मला भेटल्यानंतर, माझ्याबरोबर बोलल्यानंतर माझ्यासाठी म्हणून काहीतरी लिहिलं जाईल. त्यामुळे ही माझ्यासाठी उत्तम संधी आहे. मी याचा एक भाग होतेय हेच मला आवडलं होतं. जे काही असेल छोटी किंवा मोठी भूमिका मी करायला तयार आहे.”
गिरीजा ओकच्या या निर्णयाची दिग्दर्शक अॅटलीनेही प्रशंसा केली. पुढे गिरीजा म्हणाली की, “मी खरंच आनंदी आहे, मी त्यादिवशी असा विचार केला. अरे बापरे आपल्याला काय मिळेल? काही काम करायला मिळणार की नाही? असा विचार करून मी बॅकआउट नाही झाले. पण एक विचार डोक्यात येऊन जातो की, आपल्याला काम माहित नाही तर आपण साइन अप कशासाठी करतोय. मी त्याच दिवशी त्याला सांगितलं की, माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी तुझं काम पाहिलं आहे. मी तुझ्या कामाची चाहती आहे. तर आपण हे काम करू. पुढे काय होतं ते बघू. पण नंतर काय घडलं हे तुम्ही पाहताय.”