तमाम महाराष्ट्राला आपल्या गाण्याचे वेड लावणारं घराणं म्हणजे ‘शिंदे’ घराणं. प्रल्हाद शिंदे आणि काका मिलिंद यांच्याकडून आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांना बालपणापासूनच संगीताचा वारसा मिळाला. दमदार आवाजाच्या जोरावर आदर्श यांनी असंख्य रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले.
आदर्श यांनी मराठी सिनेसृष्टीसोबत हिंदी सिनेसृष्टीतही जबरदस्त गाणी देऊन नाव कमावले आहे. त्यांचा आवाज कायम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. त्यामुळे त्यांच्या दिशेने चाहत्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात ओढा आहे, म्हणूनच आदर्श देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते सोशल मीडियावर कामासंबंधित आणि खाजगी आयुष्यासंबंधित निरनिराळ्या पोस्ट शेअर करत चाहत्यांना नवनवीन अपडेट देत असतात.
काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर आदर्श शिंदे यांच्यासोबत संपूर्ण शिंदे कुटुंबीयांनी व्यवसाय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. शिंदे कुटुंबीयांनी पंढरपूर येथील वेळापूरमध्ये पेट्रोलपंप सुरु केला. या पेट्रोलपंपचं नाव आदर्श आनंद शिंदे असे असून या व्यवसायाचे स्वप्न आदर्श शिंदे यांच्या आईने पाहिले होते. तर आता नुकतीच आदर्श शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यावरून आदर्श शिंदे यांनी पुन्हा एकदा नवा व्यवसाय सुरु केला आहे अशा चर्चा रंगल्या.
या पोस्टमध्ये आदर्श एका रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ज्यूस सेंटरजवळ उभे आहेत. अन् या ज्यूस सेंटरचे नाव आदर्श लेमन ज्यूस असे दिसत आहे. त्यामुळे आता पेट्रोलपंपनंतर आदर्श यांनी ज्यूस सेंटर हा नवा व्यवसाय सुरु केला आहे की काय असा अनेकांना प्रश्न पडला. पण सर्वांनी कोणताही गैरसमज करून न घेता या फोटोमागील खरी गोष्ट प्रत्येकाला समजावी म्हणून आदर्श यांनी खूपच छान कॅप्शन देखील लिहिले आहे.
View this post on Instagram
लेमन ज्यूस सेंटर जवळील स्वतःचा फोटो शेअर करत आदर्श यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “नवीन व्यवसाय सुरु केला आहे असं समजू नका! खूप जुना फोटो आहे हा, महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो, तेव्हा माझ्या नावाचा हा ज्यूस सेंटर दिसला. मग काय ज्यूस तर घ्यायलाच हवा आणि फोटो पण, तर आठवण म्हणून हा फोटो काढला होता. आता जुने फोटो पाहत असताना हा फोटो दिसला आणि एकटाच हसलो, तर म्हटलं ही गोड आठवण तुम्हासोबत पण शेअर करुया. सर्व आदर्श लेमन ज्यूस सेंटरला माझा जाहीर पाठिंबा.”
आदर्श यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अनेक कलाकार आणि त्यांचे चाहते या पोस्टला लाइक करत पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत. तसेच काही कमेंट्स तर खूपच गमतीदार आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर हिने देखील कमेंट केली तिने कमेंटमध्ये लिहिले की, “चला बरं झालं आता करिअरचे टेन्शन नाही.” तर दुसऱ्याने लिहिले की, “ “मला वाटलं तुम्ही पहिल्यांदा गायक होण्याच्या आधी लिंबू सरबत विकायचे का?” अशाच अनेक कमेंट्समुळे आदर्श शिंदे यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.