बिग बॉस १६ मध्ये विजेतपद पटकावणारा सर्वांचा आवडता रॅपर ‘एमसी स्टॅन’ हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री ही सध्या तिच्या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. अलिजेहचा ‘फर्रे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
या चित्रपटात अलिझेह व्यतिरिक्त सौमेंद्र पाधी, साहिल मेहता, जेन शॉ, प्रसन्ना बिश्त आणि रोनित बोस रॉय यांच्या महत्वाच्या भुमिका आहेत. ‘फर्रे’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून अलिजेह अग्निहोत्री देखील या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
तसेच ट्रेलरमध्ये अलिजेहपेक्षा चित्रपटातील शेवटच्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधुन घेतेल आहे. तर हा आवाज आहे ‘बिग बॉस १६’चा विजेता एमसी स्टॅनचा. एमसी स्टॅन हा गायनातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून तो ‘फर्रे’ या चित्रपटात डेब्यू करत आहे. या सिनेमाचा तो पार्श्वगायक असणार आहे. याची माहिती त्याने इंस्टाग्रामवरुन चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे. त्याने ट्रेलर शेअर करताना लिहिले की, “सलमान खानच्या चित्रपटाच्या माध्यमातून माझा प्लेबॅक डेब्यू”. आता मात्र प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
चाहत्यांनी देखील त्याच्यावर सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे. १२ व्या वर्षी त्याने रॅप सॉन्ग गायला सुरुवात केली असून तो मूळचा पुण्याचा आहे. त्यांचे ‘अस्तगफिरुल्लाह’ हे गाणं चांगलच गाजलं आहे. या गाण्यात त्याने आपल्या संघर्षाचा प्रवास मांडला आहे. तशीच त्याची अनेक गाणी गाजली आहेत.