क्षेत्र कोणतेही असो, त्या क्षेत्रात पाऊल टाकताना प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असते. अशीच स्वप्ने उराशी बाळगून सिनेसृष्टीतील अनेक कलाकर मंडळी काम करताना दिसतात. अथक प्रयत्न आणि परिश्रमाने योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होते. आता अशाच स्वप्नपूर्तीचा आनंद घेणारा अभिनेता म्हणजे ‘पृथ्वीक प्रताप.’
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून पृथ्वीक महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. आपल्या उत्तम अभिनयासह अचून टायमिंग आणि शब्दांवर ताबा मिळवत आपल्या विनोदाने त्याने कायमच प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. तसेच अनेक मालिकांमध्ये देखील त्याने छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे सध्या त्याचा चाहतावर्ग देखील चांगलाच मोठा आहे. असंख्य चाहते असलेला पृथ्वीक मात्र बादशाह म्हणजेच बॉलिवूडचा किंग, ‘शाहरुख खान’चा जबरा फॅन आहे. कालच (२ नोव्हेंबर रोजी) शाहरुखचा वाढदिवस झाला. पृथ्वीकचं शाहरुखवर किती प्रेम आहे, हे आजवर त्याच्या कृतीतून अनेकदा आपल्या समोर आले आहे.
पृथ्वीक सोशल मीडियावर देखील बराच सक्रीय असतो. तो त्याच्या चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करत असतो. परंतू यावेळी त्याच्या आनंदाचे कारण शाहरुख नसून, यावेळी शाहरुखचा वाढदिवस निमित्तमात्र ठरला आहे. नुकतंच पृथ्वीकचं एक स्वप्न पूर्ण झालं. प्रचंड परिश्रम करून आता त्याने त्याचे स्वतःचे, हक्काचे घर घेतले आहे. कुटुंबासमवेत घराबाहेरचे फोटो शेअर करत पृथ्वीकने स्वप्नपूर्तीचा आनंद त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला.
View this post on Instagram
फोटो शेअर करत पृथ्वीकने लिहिले की, “आजवर अनेक स्वप्न पाहिली. अनेक पूर्ण केली¸ अनेक स्वप्न जगली आणि अनेक स्वप्न भंगली सुद्धा. पण एक स्वप्न जे आज पर्यंत हुलकावणी देत होतं ते पूर्णत्त्वाला आलं. आयुष्याची ३० वर्षे आश्रितासारखी काढलेल्या प्रत्येकाला एक दहा बाय दहाचं छप्पर ही आभाळापेक्षा कमी नसतं. आज स्वतःच्या घरापुढे उभं राहून हा फोटो काढताना खरंच आभाळ ठेंगण झाल्यासारख वाटतंय. घर छोटं आहे पण, माझ्या कुटुंबाचं आहे. ही स्वप्नपूर्तीची वाटचाल अजून अशीच सुरु राहणार आहे. कारण ‘Penthouse’ अभी बाकी है मेरे दोस्त.”
तसेच शाहरुखच्या वाढदिवसासोबतचा जुळून आलेला मेळ सांगत पृथ्वीकने पुढे लिहिले की, “गंमत म्हणजे आज २ नोव्हेंबरला हे घर माझ्या नावावर झालंय म्हणजे ‘शाहरुख खान’च्या वाढदिवशी त्यामुळे माझी ‘मन्नत’ पुरी झाली असं म्हणायला हरकत नाही. हे घर मिळण्यासाठी अनेकांची नि:स्वार्थ मदत झाली. त्या प्रेत्यकाचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.”
या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. पृथ्वीकच्या या आनंदात हास्यजत्रेच्या कलाकारांसोबतच सिनेसृष्टीतील अनेक कलाकरांनी पृथ्वीकला नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.