एल्विश यादव नंतर आता आणखी एका बिग बॉस सदस्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी बिग बॉस ओटीटी सिझन २ चा विजेता एल्विश यादव याला सापाच विष विकण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. तर आता आणखीन एक सदस्य चर्चेचा विषय बनला आहे. तो सदस्य म्हणजे स्टँड अप कॉमेडीयन आणि बिग बॉस हिंदी सिझन १७ चा विजेता मुनव्वर फारुकी.
मंगळवारी रात्री म्हणजेच २६ मार्च रोजी मुंबई पोलिसांना मुंबईतील फोर्ट येथील एका हुक्का पार्लर मध्ये अवेद्य माल असल्याची खबर मिळाली. यावेळी पोलिसांनी तिथे छापेमारी केली. यावेळी पोलिसांनी तिथून १४ जणांना अटक केली. यावेळी त्यातील एक व्यक्ती हा मुनव्वर फारुकी असल्याची पोलिसांनी सांगितलं. पण या सगळ्यांची चौकशी करून त्यांना सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी पोलिसांनी सगळ्यांची वैद्यकीय चाचणी देखील केली, आणि त्यामध्ये अनेकांसोबतच मुनव्वरची चाचणी देखील पॉझिटिव्ह आली.
याची माहिती देत पोलीस म्हणाले की, “आमच्या टीमला मुंबईतील एका हुक्का बारमध्ये हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनतर आम्ही छापेमारी केली. तिथं सापडलेल्या वस्तूंची तपासणी केल्यानंतर काही लोकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मुनव्वर फारुकीचाही समावेश आहे. त्यांनी तंबाखूचा हुक्का वापरल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील.”
यावेळी पोलिसांकडून छापेमारीत ४४०० रुपये रोख आणि १३५०० रुपये किमतीचं सामान जप्त करण्यात आले. वैद्यकीय चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मुनव्वर आणि इतर १३ जणांनवर सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा, २००३ आणि COTPA, २००३ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे. अद्याप यावर मुनव्वरकडून अजून तरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ही बातमी समोर आल्यानंतर मुनव्वरने त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत तो मुंबई एअरपोर्टवर असल्याचे सांगितले. आणि फोटोवर “Tired & Travelling” असं लिहिलं आहे. तर सध्या मुनव्वर हा राजस्थानमध्ये आहे. त्याचा फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या ही बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे.