अभिनेता राणा दग्गुबाती, बाहुबली: द बिगिनिंगमधील भल्लालदेव या प्रमुख भूमिकेमुळे तो बाहुबली म्हणून देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाला. तर आता राणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे हिंदी आणि तमिळ चित्रपट गाजवल्यावर तो आता ओटीटीवर पदार्पण करणार आहे.
राणा त्याच्या नवीन वेबसीरिजमधून पहिल्यांदाच ओटीटीवर दिसणार आहे. ‘राणा नायडू‘ या सीरिजमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजची निर्मिती करण अंशुमन यांनी केली असून, करण आणि सुपर्ण वर्मा या दोघांनी मिळून ही सीरिज दिग्दर्शित केली आहे.
तसेच आणखी एक खास बाब म्हणजे सुप्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेता दग्गुबाती वेंकटेश हे सुध्दा प्रमुख भूमिका साकारणार आहे. राणा नायडूचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला, त्यानुसार वेंकटेश हे राणाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच राणा पहिल्यांदाच त्याचे काका वेंकटेश यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे.
राणा नायडूचा ट्रेलर प्रदर्शित होताच तो प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. तर या आगामी सीरिजबद्दल बोलताना राणा म्हणाला की, “हा प्रोजेक्ट बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मी यासाठी खूप उत्सुक आहे, केवळ नेटफ्लिक्सबरोबर प्रथम काम करणं हे निमित्त आहेच पण याबरोबरच मी प्रथमच माझे काका वेंकटेश यांच्याबरोबर काम करणार आहे. या प्रोजेक्टमध्ये काम करणं हा खूप अप्रतिम अनुभव होता. या कलाकारांकडून खूप काही शिकायला मिळालं. प्रेक्षकांनाही ही वेबसीरिज आवडेल याची मला खात्री आहे.”
या सीरिजमध्ये राणा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अडचणी सोडवताना तसेच त्यांच्या संकटकाळात आधार देताना दिसणार आहे. तर राणा नायडू ही वेबसीरिज येत्या १० मार्चला नेटफलिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यासाठी प्रेक्षकवर्ग प्रचंड उत्सुक आहे.