खूपच कमी कालावधीत बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये स्वतःच स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. आलियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला.
मुलगी ‘राहा’च्या जन्मानंतर आलिया आता करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी‘ या सिनेमात रणवीर सिंग सोबत झळकणार आहे. आलिया ना फक्त तिच्या कामामुळे तर तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींमुळेही बऱ्याचदा चर्चेत असते. आत्ता सध्या तरी ती सिनेमामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि मानाचा समजला जाणाऱ्या पुरस्कारांमधील फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकनांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ज्यात आलियाने देखील स्थान मिळवलं आहे. तिने यंदाच्या ६८व्या फिल्मफेअर पुरस्कारसाठी तब्बल १६ नामांकने मिळविली आहेत.
समोर आलेल्या अहवालानुसार गंगूबाई काठियावाडीने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण या व्यतिरिक्त आणखी दहा नामांकने आलियाला मिळाली आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘ब्रम्हास्त्र भाग १: शिवा’ या सिनेमांनी देखील सर्वाधिक नामांकने मिळविली आहेत.
फिल्मफेअरच्या ट्विटरवरून काही पुरस्कारांची यादी शेअर करण्यात आली आहे. त्यानुसार आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. तर याच सिनेमातील अभिनयासाठी फिल्मफेअर अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान आलियाला मिळाला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्रच तिचे कौतुक सुरू आहे.
यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी आणि आलियाचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत तसेच या पुरस्कार सोहळ्याची देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.