२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा दुसरा भाग तब्बल २२ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘गदर २’ हा सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले असून अभिनेता सनी देओल व अभिनेत्री अमिषा पटेल हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या सिनेमातील त्यांची तारा सिंह व साकीनाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
सिनेमा प्रदर्शित होऊन २४ दिवस पूर्ण झाले असूनही सिनेमाचा क्रेझ अजूनही पहिल्या दिवसाइतकाच चांगला आहे. हा सिनेमा दिवसेंदिवस नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावे करत आहे. या सिनेमाने पहिल्या आठवड्यापासूनच बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात २८४.६३ कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या आठवाड्यात १३४.४७ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ६३.३५ कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या चौथ्या आठवड्यातच या सिनेमाने तब्बल ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
‘गदर २’ हा भारतामधील तिसरा चित्रपट आहे. ज्या सिनेमाने २४ दिवसांमध्ये ५०१.८७ कोटींचा गल्ला जमवला आहे. याआधी २०१७ मध्ये रिलीज झालेला ‘बाहुबली २’ या सिनेमाने ५१० कोटींची कमाई केली व त्यानंतर ‘पठाण’ या सिनेमाने १,०५० कोटींची कमाई केली. त्यामुळे आता प्रेक्षकांना ‘गदर २’ हा सिनेमा बॉलिवूडच्या बादशहाचा रेकॉर्ड मोडणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
प्रेक्षकांनी या सिनेमावर तसेच यातील गाण्यांवर देखील प्रेम दाखवले आहे. सनी देओल व अमिषा पटेल यांचे चाहते सिनेमागृहात पुन्हा-पुन्हा जाऊन हा सिनेमा पाहत आहेत.