तर आता पुन्हा एकदा बॉलिवूडमधील एका कलाकाराला धमकीचा फोन आला आहे. हा कलाकार म्हणजे पंजाबी गायक आणि प्रसिद्ध रॅपर हनी सिंग. हनी सिंगला फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तर ही धमकी त्याला कॅनडावरून आल्याचे समजले आहे. कॅनडामध्ये स्थित असलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारने हनी सिंगला धमकी दिल्याचे म्हण्टले जात आहे.
अधिक काळ न दवडता हनी सिंगने दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे या धमकी प्रकरणाची तक्रार दाखल केली असून हनी सिंगने स्वतःसह संपूर्ण कुटुंब देखील अडचणीत सापडेल या भीतीने पोलिसांकडे सुरक्षा मिळावी यासाठी विनंती केली.
मीडियासोबत बोलताना हनी सिंग ने सांगितले की, “मला सतत धमकीचे कॉल्स आणि व्हॉईस मेसेज येत आहेत. हे कॉल परदेशी क्रमांकावरून आले आहेत.” तसेच तो पुढे म्हणाला की, ‘मृत्यूला कोण घाबरत नाही. मला अशी धमकी पहिल्यांदाच मिळाली आहे. मला जनतेने नेहमीच प्रेम दिले आहे.”
याप्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे यापूर्वी सुप्रसिध्द पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी गँगस्टर गोल्डी ब्रारचेच नाव समोर आले होते. सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा कट यानेच रचला होता असे देखील सांगण्यात आले. त्यामुळे एकदा लागलेल्या ठेचेनंतर सर्वचजण आता दचकून आहेत. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत भीतीचे वातावरण पसरले आहे.