बॉलिवूड सिनेसृष्टीतील सुपरहीट सिनेमा म्हणजे ‘हम आपके है कौन.’ भारतात असा एकही प्रेक्षक नसेल ज्याने हा सिनेमा बघितला नसेल, असं म्हणायला देखील काही हरकत नाही.
आता सध्या काही वर्षात प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’, ‘पठाण’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ या सिनेमांमध्ये ट्रेलर अथवा सिनेमा प्रदर्शनानंतर काहीना काही बदल करण्यात आले. अनेकदा हे बदल प्रेक्षकांच्या मागणीमुळे करण्यात आले. तर यात बदल करण्यापूर्वी सिनेमांना अनेक वादांना सामोरे जावे लागले तसेच ट्रोल देखील करण्यात आले.
हे झालं साधायचं. परंतू ९०च्या दशकात देखील अशीच एक घटना घडली होती. प्रेक्षकांचा सर्वात फेव्हरेट सिनेमा हम आपके हैं कौन या सिनेमाबाबत. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी दिग्दर्शित केलेला हम आपके हैं कौन हा सिनेमा १९९४ साली प्रदर्शित झाला. उत्तम कथा, माधुरी दिक्षित, सलमान खान, रेणुका शहाणे, रीमा लागू, अनुपम खेर या दमदार कलाकारांच्या चोख अभिनय या सर्वांवर कुठेही बोट ठेवता येईल अशी जागा नव्हती.
तरी देखील हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर यात बदल करण्यात आले. त्याचे कारण म्हणजे जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा त्याची लांबी साडेतीन तासांहून अधिक होती. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसात या सिनेमाला हवा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. परंतू हे जेव्हा मेकर्सच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी या सिनेमाची लांबी कमी केली.
त्यानंतर या सिनेमाला प्रेक्षकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला की, या सिनेमाने त्यावेळी जगभरातील बॉक्स ऑफिसवर २५० कोटींची कमाई देखील अगदी सहजच केली. आजही हा सिनेमा आणि अक्षरशः यातील प्रत्येक डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहे. तसेच अनेकदा पाहिल्यानंतरही आजही पुन्हा नव्या उत्सुकतेने प्रेक्षक हा सिनेमा पाहत आहेत.