बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). ८० आणि ९० च्या दशकात ती बॉलीवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली. अवघ्या १७ वर्षांची असताना तिने ‘अबोध’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. माधुरीचे हास्य आणि तिचे सौंदर्य हे आजही अनेकांना घायाळ करते. लाखो दिलांची धडकन असणाऱ्या माधुरीच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रीराम नेने यांनी तिचं मन कस जिंकलं होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता तर सर्वांनाच आहे.
माधुरी दीक्षितने लव्हस्टोरीबद्दल सांगताना अस सांगितलं की, “आमची पहिली भेट माझ्या भावाच्या घरी पार्टीमध्ये झाली होती. माझ्या भावाच्या डोक्यात अनेक गोष्टी सुरू होत्या पण, त्याने मला काहीच कल्पना दिली नव्हती. तेव्हा यांचे (श्रीराम नेने) आई-बाबा देखील आले होते. सगळं ठरवून भेटलो असतो, तर कदाचित मी तयार झाले.”
“पहिली भेट झाल्यावर आम्ही एकमेकांना फक्त ३ महिने डेट केलं. त्यानंतर लगेच आमचं लग्न झालं. त्या ३ महिन्यात मला खरंच जाणवलं की, या व्यक्तीबरोबर आपण आयुष्य घालवू शकतो. मी लगेच माझ्या आईला या नात्याबद्दल सांगितलं. तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया होती, नक्की ना? माझ्याकडून तुला कोणतीही घाई नाही. तुला योग्य वाटेल तो निर्णय विचार करून घे. त्यावेळी मी आईला हो…माझा विचार करून झालाय असं सांगितलं होतं.” असा खुलासा माधुरी दीक्षितने केला.
माधुरी दीक्षितने १७ ऑक्टोबर १९९९ रोजी डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. लग्न झाल्यावर माधुरीने श्रीराम नेनेंबरोबर अमेरिकेत संसाराला सुरूवात केली. त्यांच्या लग्नाला २४ वर्ष झाले असून त्यांना अरिन आणि रयान अशी दोन मुलं आहेत. मागील वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर माधुरीने एका मराठी चित्रपटाची घोषणा केली होती. ‘पंचक’ असं या चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट ५ जाानेवारी प्रदर्शित होणार आहे.
माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेंसह ठिकठिकाणी मुलाखत देताना दिसत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्या दोघांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं