मराठी कलाविश्वात असे अनेक स्टार किड्स आहेत, जे अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून आपल्या सर्वांच्या भेटीस येत असतात. यामध्ये दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे, सुप्रिया आणि सचिन पिळगांवकर यांची लेक श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) तसेच अनेक स्टार किड्सचा समावेश आहे.
२०१३ मध्ये ‘एकुलती एक’ या मराठी सिनेमातून श्रियाने तिच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. तर या पहिल्याच सिनेमात ती सचिन पिळगांवकर यांच्यासोबत झळकली होती. २०१५ मध्ये श्रियाच्या ‘उन प्लस उने’ या फ्रेंच चित्रपटाची स्क्रिनिंग टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली होती. तर त्यानंतर २०१६ साली शाहरुख खानच्या ‘फॅन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्या पाठोपाठ तिने २०१९ मध्ये ‘बिचम हाऊस’ या ब्रिटीश टेलिव्हिजन सीरिजमध्ये काम केले. तर २ वर्षानंतर श्रियाने हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषेत प्रदर्शित झालेल्या ‘हाथी मेरे साथी’ या सिनेमात झळकली होती. आता तिने तिच्या आगामी अनेक सिनेमांची आणि सिरीजची घोषणा केली आहे. यात ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या सिनेमाचा तर ‘ताजा खबर’ आणि ‘ब्रोकन न्यूज 2’ या सिरीजच्या दुसऱ्या सिझनचा समवेश आहे.
श्रिया तिच्या कामामुळे चर्चेत असली, तरी ती तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून श्रिया ही सचिन आणि सुप्रिया यांची दत्तक मुलगी आहे, अशा अनेक अफवा वारंवार पसरत होत्या. तर ते स्वतः श्रियाने देखील वाचले होते. पण या आधी तिने या विषयावर कधीच भाष्य केले नव्हते. पण आता तिने पहिल्यांदाच यावर मौन सोडले आहे.
श्रियाने नुकतीच ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. तेव्हा ती म्हणाली की, “यात काडीचंही सत्य नाही आणि हे सिद्ध करण्यासाठी मला माझा जन्माचा दाखला दाखवण्याची गरज नाही. नाही, मी दत्तक घेतलेली नाही. माझ्या पालकांनी मला दत्तक घेतल्याची बातमी मी कुठेतरी वाचली होती आणि त्यात जराही सत्य नाही. ही अशीही गोष्ट नाही की त्याचं मी स्पष्टीकरण द्यायला हवं. कारण माझं बोलणं सिद्ध करण्यासाठी मी इन्स्टाग्रामवर माझ्या जन्माचा दाखला पोस्ट करणार नाही. पण हो, ही चर्चाच आश्चर्यकारक आहे कारण ते सत्यच नाही.”