बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक ज्युनियर महमूद यांची कॅन्सरशी सुरू असलेली लढाई अखेर अयशस्वीरित्या संपली. प्रदीर्घ काळापासून त्यांची तब्येत खालावली होती. महमूद यांना पोटा फुफ्फुसं आणि लीव्हरचा कॅन्सर होता. कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर असताना त्यांच्यावर मुंबईतील परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यासाठी मागील काही दिवस ते व्हेटिंलेटरवर होते. परंतू या उपचारांचा काहीएक फायदा झाला नाही, कारण कॅन्सरशी सुरू असलेली ही झुंज ते हरले. अखेर वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
ज्युनियर महमूद यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९५६ मध्ये झाला असून त्यांचे खरे नाव नईम सैय्यद आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. ‘हाथी मेरे साथी’, ‘कारवां’ आणि ‘मेरा नाम जोकर’ यांशिवाय अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. ज्युनियर महमूद यांनी ७ भाषांमध्ये २६५ सिनेमांहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी मराठी सिनेमाचे दिग्दर्शन देखील केले आहे. ५० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी सिनेसृष्टीत मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या कॉमेडी भूमिकांनी प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली होती.
महमूद यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचे मित्र अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या दोन्ही मित्रांनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली होती. गेल्या १५ वर्षांपासून सलाम काझी आणि ज्युनिअर महमूद यांची घट्ट मैत्री होती. ज्युनियर महमूद यांच्यावर आधी त्यांच्या घरीच उपचार केले जात होते.
काही दिवसांपूर्वी ज्युनियर महमूद यांच्या तब्येतीची माहिती देत असताना सलाम काझी म्हणाले होते की, “ज्युनियर महमूद गेल्या २ महिन्यांपासून आजारी होते. सुरुवातीला आम्हाला वाटले की, नेहमीप्रमाणे तब्येतीची कुरबुर असेल. त्यातून ते बरेसुद्धा झाले. पण, नंतर अचानक त्यांचे वजन कमी होऊ लागले आणि तेव्हाच कॅन्सरचे निदान झाले. जेव्हा ज्युनियर महमूद यांचा मेडिकल रिपोर्ट आला, तेव्हा त्यांना यकृत आणि फुफ्फुसात कर्करोग, आतड्यात गाठ आणि कावीळही झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण डॉक्टरांनी हा कॅन्सर चौथ्या स्टेजचा असल्याचे आधीच सांगितले होते. कॅन्सर एक महिन्यापूर्वीच कळला असला, तरी तो स्टेज फोरमध्ये होता. डॉक्टरांनी त्यांच्याकडे आता अवघे ४० दिवसांचेच आयुष्य असल्याचे म्हटले होते.”
ज्युनियर महमूद यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, सुना आणि एक नातू आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी व कलाकारांनी त्यांच्या निधनानंतर शोककळा व्यक्त केली आहे.