अयोध्येतील भव्य राम मंदिराचा उद्घाटन सोहळा येत्या २२ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. २२ जानेवारीला देशात दिवाळी साजरी करा, असे देखील सांगण्यात आले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अत्यंत कमी वेळ राहिला आहे. तसेच संपूर्ण देशभरातील लोकांना या उत्सवामध्ये सामील करून घेण्यासाठी निमंत्रण पत्रिका पाठवली जात आहे. या पत्रिकेची पहिली झलक समोर आली असून राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे देशभरातील दिग्गज लोकांना निमंत्रण देण्यात येत आहेत.
सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मंदिर ट्रस्टकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सात हजारांहून जास्त लोकांना निमंत्रित केलं जाणार आहे. यामध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योगपती मुकेश अंबानी व गौतम अदानी यांसारख्या व्हीआयपींचाही समावेश आहे. सिनेइंडस्ट्रीतल्या इतर सोलिब्रिटींबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच रजनीकांत, केजीएफ स्टार यश, धनुष, प्रभास हे साऊथ स्टारही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावतील, असं म्हटलं जात आहे. आतापासूनच अयोध्येत पयर्टकांची गर्दी सुरु आहे.
बॉलिवूड कलाकारांबरोबर आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीलाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची अक्षता निमंत्रण मिळालेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ‘आई कुठे काय करते’ फेम म्हणजेच प्रेक्षकांची आवडती ‘संजना’ अर्थात रुपाली भोसले ही आहे. रुपालीने इन्स्टाग्रामवर तिला मिळालेल्या अक्षत निमंत्रणाची झलक शेअर केली. या व्हिडिओला तिने ‘मेरे घर राम आए है’ हे गाणे वापरले आहे. रुपलीने व्हिडिओमध्ये तिला मिळालेली निमंत्रण पत्रिका दाखवली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने असे कॅप्शन दिले की, ‘जय श्री राम, अक्षत निमंत्रण’. ‘#अयोध्या #Ayodhya #RamMandir #JaiShreeRam #22January2024RamAayenge’, असे हॅशटॅगही तिने या पोस्टसाठी वापरले आहेत.
View this post on Instagram
रुपालीच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट करत ‘जय श्रीराम’ असे म्हटले आहे. दरम्यान आता या सोहळ्यासाठी रुपाली २२ जानेवारी रोजी अयोध्येत जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान १६ जानेवारीपासूनच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. या सोहळ्याला देशभरातून जवळपास ४००० साधू संत उपस्थित राहणार आहे. एवढेच नाही तर ७ हजाराहून अधिक पाहूण्यांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर २३ जानेवारीपासून राम मंदिर सर्वसामन्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.