मराठी नाटक, मालिका सिनेमा एवढंच नाही तर सिरीजमधून काही ना काही नव्या गोष्टी प्रेक्षकांसमोर ठेवण्याचं काम आपले मराठमोळे कलाकार कायम करत असतात. तर त्यापैकीच एक म्हणजे ‘संस्कृती बालगुडे’ (Sanskruti Balgude).
संस्कृतीने तिच्या उत्तम कामामुळे सर्वांचेच मन जिंकून घेतले. त्यामुळे तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. संस्कृतीचे अनेक चाहते आहेत. पण संस्कृती देखील एका अभिनेत्याची खूप मोठी चाहती आहे. तर हा अभिनेता कोण याचा नुकताच तिने खुलासा केला. तसेच त्या अभिनेत्यासोबत आता काम करण्याची देखील तिला मिळाली आहे. ‘मिरची मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत संस्कृतीला तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल विचारण्यात आले.
तेव्हा संस्कृती म्हणाली की, “खऱ्या गोष्टीवर आधारित अशी एक स्पेशल फिल्म पाइपलाइनमध्ये आहे. या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे. कारण- वेगळा अनुभव मिळालाय मला या चित्रपटातून. चित्रपटाचं शूटिंग झालंय आणि आता त्याचं पोस्ट प्रॉडक्शन सुरू आहे. त्याच्याविषयी थोडंसं मीडियामध्येही आलं होतं. कदाचित माझ्यासाठी हा चित्रपट माझं आयुष्य बदलणारा असेल.”
तसेच संस्कृती पुढे म्हणाली, “अजून एक चित्रपट येतोय आणि मी त्यासाठी खूप उत्साहित आहे. अशा पद्धतीचा चित्रपट मराठीत खूप दिवसांनंतर येतोय. आपण आता हल्लीचे जे चित्रपट बघतो ना त्यापेक्षा हा वेगळा चित्रपट आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही खूप मस्त आहे. या चित्रपटात माझा अत्यंत लाडका अभिनेता आहे; ज्याची मी फॅन आहे. आम्ही नंतर मित्र झालो; पण मी अजूनही त्याला सांगत असते की, मी पहिली तुझी फॅन आहे आणि नंतर मैत्रीण आहे. तो मित्र म्हणजे सिद्धार्थ मेनन. त्याच्याबरोबर मी या चित्रपटात काम करतेय.”
“आम्ही याआधी ‘जून’ चित्रपटामध्ये एकत्र काम केलंय; पण ते असं समोरासमोर नाही. माझा सीन दुसरीकडे होता. जेव्हा ‘जून’ प्रदर्शित झाला, तेव्हा आमची मैत्री झाली. आमचं खूप गोष्टींमध्ये पटतं. मी त्याला ‘मॅजिक’ म्हणते आणि तो मला ‘गोल्डन गर्ल’ म्हणतो. मी त्याला आधी म्हणायचे की, आपल्याला ना एकत्र असं भारी काम मिळायला पाहिजे; जिथे आपले असे एकत्र सीन असतील आणि ते शेवटी झालंय,” असंही संस्कृती म्हणाली.