‘पुष्पा द राइज’ हा तेलुगु भाषेतीली चित्रपट आहे, जो सुकुमार यांनी लिहिला व दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन व रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहे. ‘पुष्पा द राइज’ चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा बहुभाषिक चित्रपट हिंदीसह अनेक भाषेत डब केला गेला. ‘पुष्पा’ मधील डायलॉगपासून ते अल्लू अर्जुनच्या चालण्याच्या पद्धती पर्यंत ह्या चित्रपटतील प्रत्येक गोष्टीवर रिल्स आणि व्हिडिओ तयार होत आहेत. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अल्लू अर्जुनने साकारलेली चंदनतस्कर पुष्पाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचं सोशल मीडियावरुन दिसून येत आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये ‘पुष्पा’ अनेक ठिकाणी मराठी शब्द वापरतानाही दिसतोय.
विशेष म्हणजे हा चित्रपट जेव्हा हिंदीत डब झाला तेव्हा मराठमोळ्या श्रेयस तळपदेने अल्लू अर्जुनच्या भूमिकेसाठी आवाज दिला होता. या चित्रपटातील संवाद आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत. त्याबद्दल श्रेयस तळपदेने खुलासा केला आहे.
श्रेयस तळपदे हा मराठी अभिनेता असून त्याने मराठीसह हिंदी चित्रपटात देखील चांगला ठसा उमटवला आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की ‘पुष्पा’साठी डबिंग करताना काही डायलॉग अधिक प्रभावशाली बनवण्यासाठी त्यामध्ये थोडे बदल केले व अल्लू अर्जुनच्या डायलॉगचे भाषांतर ‘पुष्पा जायेगा नाही’ अस होत पण आम्ही ते ‘पुष्पा झुकेगा नाही’ अस केलं. तो पुढे असं म्हणाला की तसेच “फ्लॉवर नही फायर है मैं’ हा आयकॉनिक डायलॉग मूळ चित्रपटात अस्तित्वात नव्हता. आम्ही तो हिंदी डब व्हर्जनमध्ये सुधारित केला आणि वर्षभरानंतरही लोक त्याचा संदर्भ घेताना दिसतात. शाब्दिक भाषांतराऐवजी, आम्ही त्यात सुधारणा करतो त्यामुळे पात्राचे सार टिकवून ठेवता येते. तसेच प्रेक्षकांच्या लक्षात देखील राहते.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
‘पुष्पा’ चित्रपटाला मिळालेल्या भरघोस प्रदिसादानंतर आता ‘पुष्पा २’ बद्दल प्रेक्षकांना आतुरता आहे. ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. २०२४च्या मार्च-एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे असे बोलले जाते. ‘पुष्पा २’ मध्ये देखील अल्लू अर्जुन, फहाद फाजिल व रश्मिका मंदाना दिसणार आहेत.