मागील काही वर्षांत मराठी सिनेसृष्टी यशाचं आणि लोकप्रियतेचं नवनवीन शिखर गाठत आहे. कधी नाटक, कधी मालिका तर कधी सिनेमा यातून मराठी कलाकार असंख्य प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. सध्या रंगभूमीवर भाऊ कदम (Bhau Kadam) आणि ओंकार भोजने (Onkar Bhojane) यांचे ‘करून गेलो गाव’ (Karun Gelo Gav) हे नाटक चांगलच गाजत आहे.
सध्या विसर पडत चाललेल्या रंगभूमीला देखील नवनवीन नाटकांमुळे आणि कलाकारांचा आणि प्रेक्षकांचा या दिशेने वाढणारा कल पाहून उभारी आली आहे. मागील काही दिवसांत नाटक क्षेत्रात अनेक नव्या नाटकांची भर पडली. त्यात देवबाभळी, सफरचंद, खरं खरं सांगा, चारचौघी, आमने सामने, तू तू मी मी अशा अनेक नाटकांचा समवेश आहे. करून गेलो गाव या नाटकाने देखील रसिक प्रेक्षकांचा भलामोठा ओढा स्वतःकडे खेचून घेतला आहे.
करून गेलो गाव हे नाटक महेश मांजरेकर आणि राहुल भंडारे यांच्या निर्मितीतून तर राजेश देशपांडे यांच्या दिग्दर्शनातून रंगभूमीवर अवतरले आहे. या नाटकात महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे दोन्ही कलाकार प्रमुख भूमिकेत आहे. सर्वांच्या उत्तम कलाकृतीमुळे या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आहे. या नाटकाचा नुकताच एक प्रयोग पार पडला, नेहमीप्रमाणे तिसरी घंटा झाली, नाटकाचा प्रयोग सुरु झाला आणि हळूहळू नाटकात रंगत येऊ लागली. जसं जसं गाणी आणि नृत्य सुरु झाले, तसं टाळ्यांचा, हास्याचा आणि शिट्यांचा एकच कडकडाट झाला. नाट्यगृहातील असा नजारा आपण अनेकदा पाहिला आहे, पण या प्रयोगाचे वैशिष्ट्ये काही औरच होते.
नाटकाला मनमुराद दाद देणाऱ्या संपूर्ण प्रेक्षकवर्गामधील २ प्रेक्षक पाहून उपस्थित अन्य प्रेक्षक आणि नाटक सादरकर्ते असे सारेच अवाक् झाले. त्याचे कारण म्हणजे खास हे नाटक पाहायला परदेशी पाहुणे आले होते. मूळचा इंगलंडचा असणारा एक पुरुष आणि मूळची अमेरिकेची असलेली एक महिला या सिनेमासाठी आले. या दोघांनीही या नाटकाचे तिकीट ऑनलाईन पद्धतीने काढून नाटक पाहण्यासाठी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात उपस्थित होते. नाटक सुरु असतानाचा त्या दोघांचा असलेला सहभाग पाहून साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. परदेशी पाहुणे असल्यामुळे त्यांना मराठी आणि खास करून कोकणी भाषा त्यांना अर्थातच समजत नव्हती, पण तरी देखील ते दोघे हे नाटक लक्षपूर्वक पाहत आनंद घेत होते.
नाटकाचा प्रयोग संपल्यावर त्यांनी पडद्यामागे जाऊन निर्माते राहुल भंडारे आणि नाटकातील कलाकारांची भेट घेतली. तसेच त्यांचे मनभरून कौतुकही केले. तेव्हा ते म्हणाले की, “आम्हाला भाषा कळत नव्हती. पण हे नाटक खूप आवडलं. आम्ही ते खूप एन्जॉय केलं. या नाटकातली नृत्यं छान होती. थिएटरमध्ये हास्याचा खळखळाट होत होत ते पाहून आम्हालाही हसू येत होतं. नाट्यगृहातलं एकूण वातावरणच अद्भुत होतं. आमच्यासाठी हा खूपच छान अनुभव होता.”
मराठी प्रेक्षकांसह जेव्हा परदेशातील प्रेक्षकांचा असा प्रतिसाद येतो तेव्हा मात्र सादरकर्त्यांच्या आनंदात चांगलीच भर पडते.