आयुष्यात प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःच एक सुंदर घर असावं आणि मुंबईमध्ये घर म्हणजे सोन्याहून पिवळे. मध्यमवर्गीय माणसांप्रमाणेच सेलिब्रिटींचीही इच्छा असतेच. अनेक कलाकारांनी आतापर्यंत करोडोंच्या किमतीत घर खरेदी केले आहे. त्यात आणखी एक भर म्हणजे अभिनेत्री जान्हवी कपूर.
जान्हवीने आजपर्यंत मिली, धडक यांसारख्या अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तसेच ती सोशल मिडियावर देखील प्रचंड चर्चेत असते. तर आता देखील सर्वत्र तिच्याच नावाची चर्चा सुरु आहे त्याचे कारण म्हणजे तिने खरेदी केलेल्या नवीन घराच्या किमतीवरून.
View this post on Instagram
जान्हवीने मुंबईच्या वांद्रे उपनगरातील पाली हिल परिसरात एक आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. वांद्रे येथील पाली हिल भागात अनेक सेलिब्रेटी तसेच व्यावसायिक राहतात. शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान हे सर्व देखील वांद्रे परिसरात राहतात.
या अपार्टमेंटमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ६,४२१ चौरस फूट इतके चटईक्षेत्र आहे. indexapt च्या माहितीनुसार या व्यवहाराकरिता जान्हवी आणि तिच्या कुटुंबीयांनी ३.९० कोटी स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. हा व्यवहार १२ ऑक्टोबर २०२२ रोजी झाला आहे. या अपार्टमेंटमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर बगीचा, स्विमिंग पूल अशा सुविधा असणार आहेत. यामध्ये पार्किंगसाठी पाच स्लॉट देण्यात आले आहेत. त्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण होणार नाही.
जान्हवीने खरेदी केलेल्या या आलीशान घराची किंमत तब्बल ६५ कोटी रुपये एवढी आहे. जान्हवी प्रमाणेच अभिनेता रणवीर सिंगनेदेखील वांद्रे परिसरात ११९ कोटींचे घर विकत घेतले आहे.