२०२२ हे वर्ष कन्नड चित्रपटसृष्टीसाठी खूप खास होतं, या वर्षात कन्नड चित्रपटसृष्टीने दणदणीत पैसे कमवले. ‘केजीएफ २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली अन् पाठोपाठ आलेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाने रेकॉर्ड मोडून एक वेगळाच इतिहास रचला. हा चित्रपट आधी फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला, त्यानंतर इतर भाषांत प्रदर्शित झाला. कन्नड भाषेत हा चित्रपट जितका गाजला, तितकाच इतर भाषांमध्येही गाजला. या चित्रपटामुळे रिषभ शेट्टी रातोरात स्टार झाला, यामुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी देखील मिळाली.
जानेवारीमध्ये या चित्रपटाला १०० दिवस पूर्ण झाले, या निमित्ताने होमबाले फिल्म्सचे संस्थापक विजय कीरगंदूर यांनी पार्टी ठेवली होती. यावेळी रिषभ शेट्टीने ‘कांतारा २’बद्दल भाष्य केलं, ‘kantara 2’ हा मूळ चित्रपटाचा प्रीक्वल असणार आहे असं रिषभने नमूद केलं. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या दुसऱ्या भागात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला दिसणार असल्याची चुकीची बातमी बाहेर आली होती.
‘कांतारा’ हा फक्त १६ कोटीच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे, पण याला मिळालेलं यश बघता याचा दुसरा भाग जास्त बजेटसह आणखी मोठ्या पद्धतीने सादर करण्यात असल्यची चर्चा होत आहे. ‘कांतारा’ ने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटी एवढी कमाई केली आहे.
मिडिया रिपोर्ट नुसार या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात रजनीकांत दिसणार असल्याच म्हंटल जात आहे. रजनीकांत यांनी त्याच्या सोशल मिडियावरून या चित्रपटाच भरभरून कौतुक केल आहे, अभिनेता रिषभ शेट्टीने देखील रजनीकांत यांची भेट घेतली आहे. परंतू या बद्दलची अधिकृत माहिती आजून समोर आली नाही. आता ‘Kantara 2’ साठी प्रेक्षक अधिक उत्सुक आहेत.