बिग बॉस मराठी हा फार कमी वेळात घराघरात पोहोचलेला लोकप्रिय शो आहे. बिग बॉस हा वादग्रस्त कार्यक्रम म्हणून त्याची ओळख असली तरी तो तितकाच मनोरंजक कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. स्पर्धकांमधील वाद-विवाद, मैत्री, प्रेम आणि दररोज येणारे नवनवीन टास्क यामुळे हा बिग बॉस मराठी शो कायमच चर्चेत असतो.
कलर्स मराठी या वाहिनीवरील बिग बॉस मराठी चे तीनही पर्व सुपरहिट ठरल्यानंतर आता चौथे पर्व लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. आतापर्यंतच्या तिन्ही पर्वाचे सूत्रसंचालन हे महेश मांजरेकर यांनी केले होते.
काही दिवसांपूर्वी कलर्स मराठी ने प्रदर्शित केलेल्या चौथ्या पर्वाच्या प्रोमो नंतर या पर्वाचे होस्ट कोण असणार यावरून प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. बिग बॉसच्या निर्मात्यांनी महेश मांजरेकर यांच्यासोबत तीन वर्षांसाठी केलेल्या करारानुसार याची मुदत मागील वर्षीच संपली आहे. त्यामुळे आता महेश मांजरेकर यांच्या ऐवजी सिद्धार्थ जाधव याच्या नावाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु होती परंतु या सर्व प्रश्नांच्या उत्तरांना पूर्णविराम मिळाला आहे.
View this post on Instagram
कलर्स मराठी या वाहिनीने नुकतंच बिग बॉसच्या होस्ट संदर्भात एक प्रोमो शेअर करत चौथ्या पर्वाच्या होस्टच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. कलर्स मराठीने प्रदर्शित केलेल्या या प्रोमो मध्ये त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओ मुळे स्पष्ट झाले आहे की बिग बॉस मराठी चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन हे दुसरे कोणी नसून महेश मांजरेकरच करणार आहेत.
प्रोमोद्वारे “विद्यार्थी वेगळे, पण मास्तर तोच” असे म्हणत महेश मांजरेकर यांनी बिग बॉसच्या प्रेक्षकांमधील चौथ्या पर्वाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. तसेच महेश मांजरेकर यांनी सुद्धा हा प्रोमो स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत ‘बिग बॉस मराठी’ च्या चौथ्या पर्वाच्या होस्टवर अखेरीस शिक्कामोर्तब केला आहे.