रिअॅलिटी शो कोणताही असो, त्याच्या नवख्यापणामुळे आणि निरनिराळ्या गोष्टींमुळे प्रत्येक रिअॅलिटी शो ओळखला जातो. यामध्ये बिग बॉस, रोडीज, खतरों के खिलाडी यांसह आणखी एका शोचे नाव आवर्जून घेतले जाते तो शो म्हणजे ‘हसल’ (Hustle). या शोचे याआधी दोन पर्व पूर्ण झाले होते. तर मागील काही दिवसांपूर्वी या शोचे तिसरे पर्व म्हणजेच हसल 03 पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला.
भारताचा रॅप रिअॅलिटी टेलिव्हिजन शो एमटीवीवरील हसल 03 (MTV Hustle 03) या शोमध्ये अनेक उत्तोमोत्तम स्पर्धक होते. त्यापैकी महाअंतिम भागात यंदा कोण बाजी मारणार हाच प्रश्न सर्वांना पडला होता. चार महिन्यांपासून वाट पाहत असलेल्या फिनालेचा शेवटी निकाल लागलाच. दिल्लीच्या अठरा वर्षीय ‘उदय पांधी’ने एमटीवी हसल 03 ची ट्रॉफी आपल्या नावावर करत सर्वांचे मन जिंकले. उदय हा दिल्लीचा राहणार असून त्याने वयाच्या अवघ्या अठरा वर्षातच रिअॅलिटी शोची ट्रॉफी पटकावत प्रेक्षकांना अवाक् केले हे नक्की. हसलच्या विजेत्यांच्या इतिहासातील उदय हा वयाने सर्वात छोटा रॅपर आहे.
उदय गेल्या ९ वर्षांपासून दिल्लीत रॅप करत आहे. उदय त्याच्या ‘बॅटल रॅप’साठी सर्वाधिक ओळखला जातो. उदय पांधीने आपल्या देसी हिप-हॉपने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. हसल हा शो जिंकल्यानंतर उदयने प्रतिक्रिया देत सर्वांचे आभार मानले. तेव्हा तो म्हणाला की, “एमटीवी हसल हे एका व्यासपीठापेक्षा जास्त आहे. शिकण्याची, कठोर परिश्रम करण्याची आणि प्रयोग करण्याची ही एक संधी आहे.”
हे देखील वाचा : जोगवा आणि ॲनिमलबद्दल बोलताना उपेंद्र लिमये म्हणाले, “कलाकार म्हणून त्रास होतो..”
पुढे तो म्हणाला की, “या शोचा एक भाग झाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो, ज्याने मला पुढे जाण्याचा मार्ग दाखवला आणि एक कलाकार म्हणून लोकांना माझी ओळख करून दिली. माझे बॉस, डी एमसी यांनी मला खूप पाठिंबा दिला आहे. या शोची ट्रॉफी जिंकणं हे एखाद्या स्वप्नासारखे आहे आणि या सन्मानाने मी खुप भारावलो आहे.” हसल रिअॅलिटी शोच्या ट्रॉफी सोबतच १० लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि २.५ लाख रुपयांचे प्रायोजित सामान मिळाले आहे.
तर यावेळी बादशाहने देखील त्याचे मन मोकळे केले. तेव्हा बादशाह म्हणाला की, “आम्हाला MTV Hustle 03 Represent मध्ये हिरे मिळाले आहेत. उदयला जिंकताना पाहून मला खूप आनंद झाला. तो यासाठी पात्र आहे. या स्टेजवर पोहोचलेल्या प्रत्येक स्पर्धकाचा मला अभिमान आहे.”
तर उदय पांधीच्या या अभूतपूर्व यशासाठी त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.