कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचा चौथा सीझन हा प्रचंड गाजत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर याच रिॲलिटी शोची चर्चा आहे. त्याचे कारण म्हणजे या सीझनमधील स्पर्धकांचा उत्साह, खेळासाठीची त्यांची जिद्द यामुळे हा सीझन अधिकच रंजक होत चालला आहे.
मालिका क्षेत्रातून प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनांत पोहचलेला अक्षय केळकर हा सध्या बिग बॉसच्या घरात असला तरी बाहेर मात्र त्याचीच चर्चा रंगली आहे. त्याचे कारण म्हणजे नुकतेच त्याच्या लव्ह-लाईफ बद्दल काही खुलासे झाले आहेत आणि त्याच बरोबर त्याच्या गर्लफ्रेंडच नाव देखील समोर आले आहे.
गोदावरी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता जितेंद्र जोशी यांनी नुकतीच बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती. त्यावेळी जितेंद्र यांनी घरातील सदस्यांसाठी एक खास भेट आणली होती. ती भेट म्हणजे सदस्यांच्या प्रियजनांकडून आलेली पत्रे. यावेळी त्यांनी अक्षयला त्याच्या गर्लफ्रेंडने पाठवलेले पत्र वाचून दाखवले.
अक्षय केळकरच्या गर्लफ्रेंड ने पत्रात लिहिले की,
“हाय हँडसम, खरतंर अजिबात तुला मिस यू वगैरे लिहिणार नव्हते. पण खूप जास्त मिस यू… एक महिना होऊन गेलाय आणि अजून तुझ्या नसण्याची सवय होत नाही. तुला तिकडे खूप चांगले आणि खरचं खूप चांगले मित्र मैत्रिणी भेटले आहेत. पण आम्हाला अजूनही अक्षयला रिप्लेस करणारा कोणी सापडला नाही. आता आम्ही तुझे फालतू जोक पण मिस करतोय. या सगळ्यात एक गोष्ट भारी आहे ती म्हणजे २४ तास मला तुझ्यावर लक्ष ठेवता येतं. असं तुझ्यावर २४ तास नजर ठेवण्याचं माझं स्वप्न होतंच. त्यासाठी बिग बॉस मराठीचे खूप खूप आभार. तुला बिग बॉसच्या घरात पाहून खूप चांगलं वाटतंय. तू हसलास की मनापासून आनंद होतोय. तुला रडताना पाहून आमच्याही डोळ्यात पाणी येतं. तू खूप जास्त खरा आहेस आणि याचा आम्हाला अभिमान आहे. दसरा गेला, दिवाळी गेली, अरे आता इतकं केलं आहेस तर नवीन वर्षही तिथेच सेलिब्रेट करुन ये.
मला माहितीये तिथे राहणं, टिकणं, लढणं अजिबात सोपं नाही. पण चिते की शिकार है, ये आसान नही होगी. तू मुळातच फायटर आहेस. तू सर्वच शून्यातून उभं केलंस. त्यामुळे माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू या ही वेळी कमाल करुन दाखवशील. आम्ही एकमेकांची आणि डार्लिंग कारची काळजी घेतोय. घरात ट्रॉफीसाठी जागा ठरली आहे. आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे. जिंकून ये.
-(रमा)”
View this post on Instagram
यावरून अक्षयच्या गर्लफ्रेंडच नाव रमा आहे असं समजते. तिने या पत्रात स्वतः या नावाचा उल्लेख केला आहे. तर हे पत्र ऐकल्यानंतर अक्षय खूप भाऊक झाला अन् त्याच्या लव्ह लाईफ बद्दल खुलासा केला. तेव्हा त्याने सांगितले की, आमचं एकमेकांवर आठ वर्षांपासून प्रेम आहे. तिच्याही घरचे हे सर्व बघत असतीलच पण हे नातं पुढे जाणं खूप कठीण आहे. पण आमचं प्रेम आहे. मला तिने शून्यातून वर येताना पाहिलं आहे. ती माझ्या घराच्यांना खूप छान सांभाळते, जरी मी त्यांच्याशी बोलत नसलो तरी. रमा हे तिचं टोपण नाव आहे. कारण मला रमा-माधव ही जोडी फार आवडते. त्यामुळे मी तिला रमा म्हणतो. पण मी तिचं खरं नाव घेतलं तर पुढे आमचं काहीच होणार नाही आणि आतापर्यंतची माझी आठ वर्षे इथेच थांबतील.
यावेळी अक्षयला मात्र रडू आवरेना. यावर जितेंद्र जोशी म्हणाले की, “मी तुला शब्द देतो की, तू असा खेळ की ते स्वत:हून तुझ्या घरी येतील.” त्यावर अक्षयने “आय लव्ह यू रमा, मी खरंच फक्त तुझा आहे” असे म्हटले. परंतू अक्षयच्या गर्लफ्रेंडच नावं अजूनही गुलदस्त्यातच आहे.