सोशल मीडियावर एखादा नवीन ट्रेंड आला की सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीसुद्धा त्या ट्रेंडला फॉलो करताना दिसतात. यातच आणखी एका जोडीने हा ट्रेंड फॉलो केला आहे. ही जोडी दुसरं कुणी नसून अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ते मुंबईत एकत्र दिसले होते. त्यानंतर सोमवारी या दोघांनी एनेमीच्या एका ट्रेंडिंग लोकप्रिय गाण्यावर नाचतानाचा एक रील पोस्ट केला.
व्हिडीओमध्ये अदिती साध्या फ्लॉवर प्रिंटेड शरारा सूटमध्ये सुंदर दिसत होती, तर सिद्धार्थने कॅज्युअल ब्लॅक शर्ट व ब्लू जिन्स घातली होती. या गाण्याच्या हूक स्टेप करत त्यांनी एकमेकांशी स्टेप्स मॅच केल्या. “डान्स मंकीज – द रील डील,” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. अदिती व सिद्धार्थच्या डेटिंगच्या चर्चा जवळपास वर्षभरापासून होत आहे. त्यामुळे अदितीने हा व्हिडीओ टाकल्यावर हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या रीलवर कॉमेंट चा वर्षाव झाला असून त्यामध्ये सोफी चौधरी, दिया मिर्झा या अभिनेत्रींचा ही समावेश आहे. रीलमधले दोन्ही माकड आपले फेव्हरेट असल्याचं पत्रलेखा म्हणाली. दोन्ही माकड खूप क्युट असल्याचं सोफी म्हणाली. त्यांचे चाहतेही या व्हिडीओवर हार्ट इमोजी कमेंट करत आहेत. दोघांच्या लग्नाबद्दलही चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘तुमच्या लग्नाची वाट पाहतोय, लवकर घोषणा करा,’ अशा कमेंट्सही त्या व्हिडीओवर पाहायला मिळत आहे.
अदिती आणि सिद्धार्थ त्यांच्या रिलेशनशिपविषयी अद्याप मोकळेपणे व्यक्त झाले नाहीत. मात्र 2021 मध्ये ‘महा समुद्रम’ या चित्रपटाच्या सेटवर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातंय. गेल्या वर्षी अदितीच्या 36 व्या वाढदिवशी, सिद्धार्थने तिच्यासोबतचा खास फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ‘हृदयाच्या राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे सर्व लहान, मोठे आणि न पाहिलेली स्वप्नंसुद्धा पूर्ण होवोत’, अशी पोस्ट त्याने लिहिली होती. सिद्धार्थचं नाव याआधी बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. समंथा रुथ प्रभू, सोहा अली खान आणि श्रुती हासन यांचंसुद्धा सिद्धार्थसोबत नाव जोडलं गेलं होतं. 2003 मध्ये सिद्धार्थने बालमैत्रीण मेघनाशी लग्न केलं होतं. मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.