रॅपर एमसी स्टॅन त्याच्या कलेमुळे संपूर्ण देशभरात चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याच्या रॅपचे लाखो चाहते आहेत. नुकताच त्याने बिग बॉसचा १६वा सिझन चांगलाच गाजवला. बिग बॉस १६चा विजेता एमसी स्टॅन सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे फारच चर्चेत आहे.
एमसी स्टॅनची हटके स्टाईल आणि त्याचे रॅप यांमुळे तो कायमच चर्चेत असतो. पण यावेळी मात्र तो त्याच्या गर्लफ्रेंड ‘बुबा’मुळे चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरात असताना एमसी स्टॅन अनेकदा बुबाबद्दल बोलताना दिसायचा. आता तर त्याने त्याच्या आणि बुबाच्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे.
बिग बॉसच्या घरात फॅमिली विक दरम्यान जेव्हा एमसी स्टॅनची आई त्याला भेटायला आली होती, तेव्हा त्यांनी देखील स्टॅन लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले होते. पण ही बुबा नक्की आहे तरी कोण? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता.
एमसी स्टॅन त्याच्या गर्लफ्रेंडला प्रेमाने बुबा म्हणतो पण तिचे खरे नाव अनम शेख असून ती आता २४ वर्षांची आहे. बुबा ही स्टॅनची दुसरी गर्लफ्रेंड आहे. बिग बॉसच्या घरात स्टॅनने त्याची लव्हस्टोरी अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्माला सांगितली होती. स्टॅन आणि बुबाची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. तर त्यांची लव्हस्टोरी सांगताना स्टॅन म्हणाला की, “माझे बुबावर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचे आहे. त्यामुळे मी ३० ते ४० लोकांना घेऊन बुबाच्या घरी लग्नाची मागणी घालायला गेलो होतो. तिच्या घरच्यांना सांगितले, आमच्या लग्नाला परवानगी द्या, नाहीतर तिला पळून घेऊन जाईन.”
तर नुकत्याच एका मुलाखतीमध्ये स्टॅनने सांगितले की, “या एक ते दीड वर्षामध्ये मला बुबाबरोबर लग्न करायचे आहे. आम्ही गेल्या चार ते पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे. ती खूप गोड मुलगी आहे. मुलगी कशी दिसते हे मी बघत नाही. फक्त ती हुशार असली पाहिजे. मी लकी आहे की, ती माझ्या आयुष्यामध्ये आहे.”
तर आता सर्वजण एमसी स्टॅन कधी लग्नगाठ बांधणार याचीच वाट फार उत्सुकतेने पाहत आहेत.