मराठी असो वा हिंदी, भारतीय सिनेसृष्टीत एकामागोमाग एक नवीनवीन सिनेमे प्रदर्शित होत आहेत. पण हे सिनेमे बनवताना मोठ्यातील मोठा आणि छोट्यातील अगदी छोटा विषय घेऊन अन् सुंदर कलाकृती साकारत कलाकार हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असतात. पण काहींना मात्र चरित्रपट बनवण्यात अधिक रस असतो. तर आता लवकरच सर्वाधिक प्रभावशाली अभिनेत्रीचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे, ती अभिनेत्री म्हणजे ‘मधुबाला’ (Madhubala).
भारतीय सिनेसृष्टीतील १९५० ते १९६० सालचा छोटासा काळ मोठ्या प्रमाणात आणि दणदणीत गाजवणारी अभिनेत्री होती मधुबाला. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट अभिनय आणि आरस्पानी सौंदर्याच्या जोरावर मधुबालाने त्याकाळी तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला. मधुबाला यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. अन् पाहता पाहता सिनेसृष्टीतील हा सुवर्ण काळ मधुबालामुळे आणखीन सुवर्ण झाला. दिवसेंदिवस यशाची एक-एक पायरी चढत असताना मधुबाला यांचं करिअर देखील त्यांच्यासोबत संपलं. केवळ ३६ वर्षांच्या असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला.
तसं पाहायला गेलं तर सिनेसृष्टीत काम करण्यासाठी त्यांना खूप कमी काळ मिळाला. पण जेवढा मिळाला त्याचं त्यांनी सोनं केलं हेही तितकंच खरं. मधुबाला यांनी जवळपास २९ वर्षे या इंडस्ट्रीमध्ये काम केले. परंतू २९ वर्षांच्या काळात त्यांनी ७६ हून अधिक सिनेमे सिनेसृष्टीला दिले. यांपैकी त्यांचे बहुतांश सिनेमे प्रचंड गाजले. त्यामुळे त्या काळी त्यांची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली होती. ‘मुगल-ए-आझम’, ‘मिस्टर अँड मिसेस 55’, ‘चलती का नाम गाडी’, ‘बरसात की रात’ ‘बसंत’, ‘नील कमल’, ‘दिल की रानी’, ‘दौलत’, ‘इम्तिहान’, ‘दुलारी’, ‘सिंगार’, ‘निशाना’ यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांतून त्यांचा अभिनय आणि त्यांची कौशल्ये दिसली. पण त्या नक्की कशा होत्या? असा प्रश्न आजच्या पिढीला सहज पडतो.
तसेच मधुबाला यांच्या आयुष्यातील आश्चर्यजनक घडामोडी आणि त्यामागील सत्य घटना आजही अनेकांना जाणून घ्यायची आहे. कारण जसं त्यांचं करिअर जोरदार चर्चेत होतं, अगदी तसंच त्यांचे खासगी आयुष्य देखील प्रचंड चर्चेत राहिलं. अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत जोडलं जाणारं त्यांचं नाव, संगीतकार किशोर कुमार यांच्यासोबत त्यांचा वैवाहिक जीवनाचा प्रवास नक्की कसा होता? हे सर्वांसमोर यावं म्हणून मधुबाला यांच्या चरित्रपटाची मागे बरीच चर्चा रंगली होती. तेव्हा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा हा या चरित्रपटाच्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या. परंतू मधुबाला यांची बहिण मधुर ब्रीज भूषण यांनी तेव्हाच खूपच स्पष्टपणे मत मांडले होते. तेव्हा त्यांनी मधुबाला यांच्यावर कोणीही बयोपिक करू नये असे सांगितले होते. अन् तेव्हाच त्यांनी मधुबाला यांच्या जीवनावर आधारित सिनेमा त्या स्वतः करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
View this post on Instagram
आता आलिया भट्टच्या डार्लिंग्स या सिनेमाचे दिग्दर्शक जसमीत के रीन यांनी नुकतीच या बयोपिकची घोषणा केली आहे. तर मधुबाला यांच्या बहिण म्हणजेच मधुर ब्रीज भूषण या सिनेमाच्या सहनिर्मात्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत त्या म्हणाल्या की, “एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे की मधूबालावर एकच बायोपिक बनेल ज्यामध्ये माझा सहभाग असेल. मला कुणाला दुखवायचा हेतू नाही, पण मधूबालाविषयी माहिती नसलेल्या गोष्टी आम्हाला लोकांसमोर आणायला आवडेल. हा बायोपिक बनवण्यासाठी मी पूर्णपणे स्वातंत्र्य द्यायला तयार आहे. मी आणि माझी टीम यावर काम करत आहोत, लवकरच याबद्दल अधिकृती घोषणाही करू. आम्ही सध्या यासाठी बरीच मेहनत घेत आहोत.”
मधुबाला यांच्या आयुष्यावरील या बयोपिकचे नाव ‘मधुबाला’ असेच आहे. तर आता या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सर्व रसिक प्रेक्षक आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दुसरीकडे मधुबाला यांच्या भूमिकेत आता नक्की कोणती अभिनेत्री दिसणार याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी, समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री ‘क्रिती सेनॉन’ ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरु आहे.