महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रताने आता पर्यंत तिच्या विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच नम्रता अनेक चित्रपट मालिकांमधून देखील आपला अभिनय सादर करत असते. सध्या नम्रता तिच्या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे.
कुर्रर्रर्र या नाटकासाठी नम्रता अमेरिकेला गेली आहे. नम्रता सोबत अभिनेत्री विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे आणि प्रसाद खांडेकर सुद्धा आहेत. कुर्रर्रर्र हे नाटक सध्या रंगभूमीवर प्रचंड गाजत आहे. या दौऱ्यादरम्यानचे काही खास व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
नम्रता सोशल मिडियावर नेहमीच सक्रीय असते, ती तिच्या चाहत्यासोबत अनेक फोटो शेअर करत असते. तिने आता एक नवीन फोटो शेअर केला आहे, आणि त्याच बरोबर एक इच्छा देखील व्यक्त केली आहे.
नम्रताने कॅलिफोर्निया मधील लॉस एंजिलीस येथील डॉल्बी थेटरच्या बाहेर फोटो काढलाय. नम्रताने हा फोटो पोस्ट करताना एक खास कॅप्शन लिहिलंय. नम्रता लिहीते.. “इथे ऑस्कर सोहळा पार पडतो लवकरच इथे पाय रोवायचेत.. स्वप्न.” असा खुलासा करत नम्रताने कधीतरी ऑस्कर सोहळ्यात येण्याचं स्वप्न उलगडलं आहे.
कुर्रर्रर्र या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांनी केल असून विशाखा सुभेदार यांनी नाटकाची निर्मिती केली आहे.