‘सैराट’ चित्रपटाच्या माध्यमातून साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणारी आर्ची-परश्या म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Akash Thosar) यांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आयरा खान व नूपुर शिखरे यांचा रिसेप्शन सोहळा शनिवारी मुंबईत पार पडला. यावेळी अनेक दिग्गज बॉलिवूड कलाकार या सोहळ्यात उपस्थित होते.
या दरम्यान बॉलिवूड कलाकारांच्या या झगमगाटात सर्वांच्या नजरा एका जोडीवर खिळल्या आणि ही जोडी म्हणजे आपले मराठमोळे कलाकार आर्ची आणि परशा. या दोघांना खूप दिवसांनी एकत्र पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. तर दुसरीकडे या दोघांचे फोटो पाहून यांचंही आता जमलंय अशा चर्चा देखील आहेत. सैराट हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच वर्ष उलटून गेली असली तरी आजही रिंकू-आकाशला एकत्र पाहून प्रेक्षकांना ‘सैराट’ चित्रपटाची आठवण येतेच. यामध्ये आर्ची-परश्याची अनोखी व हृदयस्पर्शी प्रेमकहाणी पाहायला मिळाली होती.
आता रिंकू आणि आकाश हे आयरा आणि नूपुर यांच्या रिसेप्शन सोहळ्यात एकत्र पोहोचले होते. दोघांचाही पारंपरिक साज यावेळी खुलून दिसत होता. रिंकूने निळ्या-गुलाबी रंगाची सुंदरशी साडी परिधान केली होती आणि सुंदर गडद अबोली रंगाच्या ब्लाऊसची फॅशन सोबतच केसांना सुंदर आंबाडा आणि दागिने परिधान केले होते. तिचा हा मराठमोळा साज पाहून अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले. तर आकाशने काळ्या रंगाची शेरवाणी परिधान केली होती. त्यांची ही एकत्रित हजेरी पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
View this post on Instagram
एकमेकांना साजेसा अश्या लूकमधील या सोहळ्यातील त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हेरल होत आहेत. तसेच आकाश व रिंकूने देखील त्यांच्या सोशल मीडियावरून रिसेप्शनचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंवर काहींनी आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी ही बेस्ट जोडी असल्याच्याही कमेंट केल्या. तसेच “आता लवकर लग्न करा”, “अर्ची परश्या तुमची जोडी एक नंबर आहे. भाऊ आता लवकर उरकून टाका”, “तारीख काय ठरली मग लग्नाची” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत. मात्र रिंकू व आकाशने अद्याप या कमेंट्सवर कोणतीही प्रतिक्रिया देलेली नाही. तसेच काही दिवसांपूर्वी एका चाहत्याला ‘आस्क मी सेशन’मध्ये उत्तर देताना रिंकूने ती सिंगल असल्याचं देखील सांगितलं होतं.
अशामध्ये रिंकू आणि आकाश आता खऱ्या आयुष्यामध्ये एकत्र येणार असल्याच्या देखील चर्चा होऊ लागल्या आहेत.