मराठी सिनेसृष्टीत मागील काही दिवसांत अनेकांनी लग्नगाठ बांधली. त्यापैकी काहींनी जाहीरपणे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. तर काहींनी मात्र अचानक लग्नातील समारंभाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. अशीच अचानक लग्नाची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना देणारी जोडी म्हणजे अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade) आणि अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar).
सुरुची आणि पियुष यांनी आजवर अनेक मालिका आणि सिनेमे केले आहेत. पियुष मागील काही महिन्यांपासून काव्यांजली या मालिकेत झळकत आहे. तर आता लग्नानंतर काहीच दिवसांत सुरुची देखील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत दिसली. या दोघांच्या लग्नाची बातमी समोर येताच त्यांच्यावर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पण दुसरीकडे मात्र पियुषचं हे तिसरं लग्न असल्याने त्याला ट्रोल देखील करण्यात आलं. त्यामुळे या दोघांचं कसं जुळलं? ते लग्नापर्यंत कसे पोहोचले? असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले होते. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या दोघांच्या नात्याबद्दल कधी कोणती अफवा किंवा शक्यता वर्तवली गेली नव्हती.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सुरुची आणि पियुष यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि खासकरून त्या दोघांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी त्यांचं प्रेम कसं खुललं हे दोघांनी सांगितलं. तेव्हा सुरुची म्हणाली की, “अंजली मालिकेत आम्ही पहिल्यांदा काम केलं. त्यापूर्वी आम्ही एकमेकांना फक्त माहित होतो, ओळखतही नव्हतो. तर या मालिकेमुळे पहिल्यांदा भेटलो. तेव्हा सेटवर सर्वच खूप छान होतो. मालिका संपल्यानंतर जवळपास आम्ही १ ते दीड वर्ष एकमेकांच्या संपर्कातच नव्हतो. त्यानंतर अचानक आमचं बोलणं सुरू झालं, मैत्री वाढली आणि नंतर वाटलं की हा आपण एक होऊ शकतो असं आमच्या लक्षात आलं.”
View this post on Instagram
तसेच ती पुढे म्हणाली की, “आमच्यात डेटिंग असा काळच नव्हता, जेव्हा आमच्यात मैत्री वाढत होती, तेव्हा आम्ही एकमेकांसोबत खूप गोष्टी शेअर करायचो. आणि कुठेतरी एकमेकांबद्दल दोघांच्या मनात त्याच भावना आल्या. पण आम्ही ते एकमेकांनाही सांगितल्या नाही. ना कोणी प्रपोज केलं.” तर त्यांच्या नात्याबद्दल बोलताना पियुष म्हणाला की, “मी जेव्हा आजवरचा आमचा प्रवास बघतो, तर जाणवतं की तो प्रवास खूपच भावनिक होता. आम्ही एकमेकांना सांभाळायचो, एकमेकांना ताकद द्यायचो. कारण, तिची एक वेगळी बाजू होती, माझी एक वेगळी बाजू होती. तर मला सुरुची आणि पियुष यांच्यात असलेया त्या भावनिक प्रवासाचा खूप आदर आहे.”
तसेच जेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले तेव्हा त्यांची खूपच सहज त्यांच्या नात्याला परवानगी दिली. अन् ६ डिसेंबर २०२३ रोजी सुरुची आणि पियुष लग्नबंधनात अडकले.