हिंदी ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो सध्या खूप गाजतोय. त्यातही अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडप्याची चर्चा सर्वाधिक आहे. आजवर त्यांची शोमधील भांडणं, मतभेद प्रेक्षकांनी पाहिली आहेत. आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याने, त्यांचा घटस्फोट होईल, असे प्रेक्षकांना वाटत आहे. या शोमध्ये आता स्पर्धकांच्या कुटुंबियांच्या एन्ट्रीमुळे चांगलीच रंगत आली आहे. विकी जैनची आई नुकतीच ‘बिग बॉस’ या शोमध्ये आली होती. शोमध्ये आल्यानंतर विकीची आई अंकिता लोखंडेशी वाद घालताना दिसली.
एका मुलाखतीत विकीच्या आईने सांगितलं की “विकीने अंकिताशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला आमचा पाठींबा नव्हता. अंकिताचा खर्च उचलावा लागतो, विकीने लग्न केलं आणि आता तो जबाबदारी घेण्यास तयार आहे. याच्याशी आमचा काहीही संबंध नाही.” असं त्या म्हणाल्या होत्या.
रश्मी देसाई आणि अंकिता चांगल्या मैत्रिणी आहेत. आता रश्मीनं तिला पाठिंबा दिला आहे. तिनं विकीच्या आईला म्हणजेच अंकिताच्या सासूला चांगलंच सुनावलं आहे. रंजना जैन यांनी अंकिता व विकीच्या लग्नाबद्दल, जे म्हटलं त्याचा खरपूस समाचार रश्मीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत घेतला. “माफ करा आंटी, पण अंकिताला कधीच हा शो करायचा नव्हता, तिने हा शो तिचं प्रेम विकी जैनसाठी केला. आणि खर्च उचलावा लागतो याचा काय अर्थ आहे? त्यांनी प्रेमविवाह केला आहे आणि त्यापूर्वीही ती रस्त्यावर नव्हती. ती अंकिता लोखंडे आहे. बिग बॉस तुमच्या मुलावर पैसा लावत असेल पण आमची मुलगीही खरं सोनं आहे. सगळ्यांच्या आपल्या समस्या असतात. पण तुम्हाला वाटत नाही का की त्यांचं लग्न टिकावं? प्रत्येक पती-पत्नीची भांडणं होतात. आणि हा शो अवघड आहे, दोन दिवसात तुमचे हे हाल आहेत, चार महिने काढल्यास तुम्हाला त्रास समजेल. मी तुमचा आदर करते, नेहमी करेन, पण इथे तुम्ही चुकताय.” अशी पोस्ट रश्मी देसाईने केली आहे.
‘बिग बॉस’चं १७ वं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. जितकी या पर्वाची अंतिम फेरी हळूहळू जवळ येत आहे, तितकेच या पर्वात सतत ट्विस्ट पाहायला मिळत आहे. एकबाजूला आयशा खान, मुनव्वर फारुकीचे वाद सुरू आहेत. तर दुसऱ्याबाजूला अंकिता लोखंडे, विक्की जैन याचे वाद संपायचं काही नावचं घेत नाहीये. सध्या फॅमिली वीकमुळे शोला आणखीनच रंगात आलाय हे खरं. पण आता अंकिता आणि विकीचं नातं नवीन कोणतं वळण घेणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.