भारतीय सिनेसृष्टीतील करोडो चाहते जिच्या एका झलकवर फिदा आहेत ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची धकधक गर्ल ‘माधुरी दीक्षित (Madhuri Dixit).’ नितळ सौंदर्याने आणि उत्तम अभिनयाने तसेच मनमोहक नृत्यकलेने माधुरीने कायम चाहत्यांना भुरळ घातली आहे. मराठी असो वा हिंदी सिनेमा, माधुरीने कायम प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले.
अभिनयासोबत माधुरीने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले. त्यामुळे माधुरीच्या सिनेमासाठी मागील काही वर्षांपूर्वी असलेली उत्सुकता आजही अगदी तशीच आहे. माधुरी कायम चर्चेत असते, परंतू आता मात्र ती ‘पंचक’ या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. नेने जोडप्याची निर्मिती समजल्यावर चाहत्यांमध्ये या सिनेमासाठी भारीच उत्सुकता होती. त्यामुळे या सिनेमाची आणि माधुरीची चांगलीच चर्चा रंगली होती.
पंचक हा सिनेमा ५ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पंचक हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा माधुरीने देखील पहिल्यांदाच केला, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती. तर पंचक हा सिनेमा अंधश्रद्धेवर आधारित सिनेमा नसून भीतीने घरात कसे प्रसंग घडतात हे दाखवण्यात आले आहे. पण हे गंभीर प्रसंग या सिनेमात विनोदाच्या भिंगेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खोतांच्या घरात पंचक लागल्याने आता घरातील कोणाचा नंबर लागणार? ही भीतीची पाल घरातील सदस्यांमध्ये चुकचुकत असते. तर यात सर्वांची उडणारी तारांबळ या सिनेमात दाखवली आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने माधुरी अनेक मुलाखती देताना दिसत आहे. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान माधुरीने तिच्या आयुष्यातील अंधश्रद्धा संबंधित एक प्रसंग सांगितला आहे. तेव्हा ती म्हणाली की, “मी अजिबात अंधश्रद्धाळू नाही पण, दैनंदिन जीवनात त्यासंबंधित अनेक गोष्टी आपण करत असतो. ‘ये अच्छा हो गया’ असं कोणी म्हटलं की, मी पटकन टचवूड म्हणते किंवा बोटे मोडते. बारावीची परीक्षा देताना मी सगळ्या पेपरसाठी एकच शर्ट घातला होता. माझा पहिला पेपर चांगला गेला…मग मला वाटलं हा माझा लकी शर्ट आहे म्हणून पुढच्या पेपरला मी पुन्हा तोच शर्ट घातला. त्यानंतर तेच शर्ट परिधान करून एक पेपर मला साधारण बरा गेला…फारसा चांगला गेला नाही. तेव्हा माझी आई मला म्हणाली होती की, लकी शर्ट वगैरे काही नसतं. तुम्ही किती प्रयत्न करता ते महत्त्वाचं असतं. तिचा तो सल्ला मला आजतागायत आठवत आहे.”
पंचक सिनेमात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे कलाकार झळकले आहेत.
हे देखील वाचा : अंकिताच्या मैत्रिणीने तिच्या सासूला सुनावले म्हणाली, “ती रस्त्यावर नव्हती…”