यंदा ‘बिग बॉस १७’च्या नव्या पर्वातील अनोख्या थीममुळे काही स्पर्धक एकटे आले नसून त्यांच्यासोबत त्यांचे जीवनसाथी देखील आले आहेत. यानिमित्त अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) व ऐश्वर्या-नील या दोन जोड्या आहेत. रोज बिग बॉसच्या घरात काही ना काही सुरु असतं. कधी स्पर्धकांमध्ये तर कधी नवरा-बायकोमध्ये. त्यात अंकिता आणि विकीमध्ये सतत काही ना काही कारणांवरुन खटके उडताना दिसतात. त्यामुळे या पर्वात नवरा-बायकोची भांडणं हा चर्चेचा विषय ठरला आहे.
या शोमध्ये येण्याआधीही अनेक प्रेक्षक असा अंदाज लावत होते की, बिग बॉसच्या घरात जाऊन हे कपल चूक करत आहेत. आता लोकांची भीती खरी होताना दिसत आहे. सुरुवातीला अंकिता सतत विकीच्या मागे-मागे करताना दिसली. मात्र, विकीने नात्यापेक्षा नेहमीच खेळाला जास्त महत्त्व दिलं. बिग बॉसच्या घरात विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यातील भांडण सध्या इतके वाढली आहेत की, त्यांच्या कुटुंबीयांना देखील या शोमध्ये येऊन त्या दोघांची समजूत घालावी लागली.
नुकतंच नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये अनेक कारणांवरून वाद पेटले. विकी आणि आएशा खान यांच्यात चाललेल्या संवादावरुन भांडणाची सुरुवात झाली. दोघांनी लग्नावरुन मस्करी केली. लग्न झालेल्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं असं विकी म्हणाला. त्यातही पुरुषांना जास्त सहन करावं लागतं असंही तो म्हणाला. त्यामुळे या दोघांचं राहिलं बाजूलाच अन् नव्या वादाला फोडणी बसली. त्यावेळी विकी म्हणाला, “मला कसे वाटते हे मी कधीच सांगू शकत नाही. विवाहित लोक, विशेषत: पुरुष अशाच परिस्थितीतून जातात. ते खरोखर कशातून जात आहेत आणि त्यांना काय त्रास होतो हे ते स्पष्ट करू शकत नाहीत.” विकीचे हे बोलणे ऐकून अंकिता चिडली आणि म्हणाली की, “जर तुला इतकं सहन करावं लागतंय तर मग का आहेस माझ्यासोबत? चल घटस्फोट घेऊ. मला तुझ्या घरी यायचं नाही.”
तर आयशासमोर आपला राग व्यक्त करत अंकिता म्हणाली की, “मला माहित आहे की, विकी माझ्यावर प्रेम करतो, पण मला जे हवे आहे ते तो मला देऊ शकत नाही. कधीकधी मला असे वाटते की, तो सतत माझ्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तो नेहमी वर्चस्व गाजवतो. माझ्या हेही लक्षात आले आहे की, जेव्हाही मी पुरुष स्पर्धकाशी भांडू लागते, तेव्हा तो मला थांबवायला लागतो.”
अंकिता बिग बॉसच्या घरात अनेकदा एकटी वाटत असल्याची खंत तिच्याहून जास्त तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. स्वतः चा नवरा विकी आपल्याला साथ देत नाही, अशी तक्रार ती अनेकदा शोमध्ये करताना दिसली आहे. विकी व अंकिताचे लग्नाच्या एक वर्ष आधी अफेर चालू असताना जवळपास रिलेशनच्या महिन्याभरातच त्यांचं ब्रेकअप झाल्याचे देखील अंकिताने यापूर्वी सांगितले होते. या शोमध्ये अनेकदा अंकिता आणि विकीमध्ये वादाच्या ठिणग्या पडताना दिसत असल्या तरी शोमुळे त्यांच्या खऱ्या आयुष्यात ते टोकाचं पाऊल उचलणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.