आज २१ व्या शतकात प्रत्येकजण आपाआपल्या कामात व्यग्र असतो. सततचा ताण आणि अतिरिक्त काम, कमी झोप यामुळे अनेकजण निरनिराळ्या आजारांना सामोरे जात असतात. स्वतःच्या फिटनेसकडे कटाक्षपणे लक्ष देणारे सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील याला बळी पडतात. तर आता मागील काही दिवसांत याचं कारणामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्याला, ‘श्रेयस तळपदे’ला (Shreyas Talpade) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
१४ डिसेंबर रोजी ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाचं शूटिंग संपवून घरी आल्यावर श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तात्काळ अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यामुळे अनेकांना त्याची काळजी वाटत होती. श्रेयस मागील सात दिवसांपासून रुग्णालयात होता. इतक्या दिवसानंतर श्रेयसला आता डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तसेच यापूर्वी देखील सोशल मीडियावरून श्रेयसच्या तब्येतीची माहिती त्या चाहत्यांना देत होत्या.
View this post on Instagram
दीप्ती तळपदे यांनी केलेल्या या पोस्टमध्ये श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? तसेच त्यांच्या मदतीला नेमकं कोण-कोण आलं? यांसाख्या अनेक बाबींवर त्या व्यक्त झाल्या. तसेच यावेळी त्यांनी अनेकांचे आभार मानले. दीप्ती यांनी श्रेयस सोबतचे काही खास फोटो शेअर करत ही पोस्ट केली. त्यांनी लिहिले की, “माझं आयुष्य, श्रेयस सुखरुप घरी परतला आहे. मी श्रेयसशी वाद घालत म्हणायचे की कोणावर विश्वास ठेवावा हे मला कळत नाही. आज मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. देवावर विश्वास ठेवावा. ज्या संध्याकाळी आमच्या आयुष्यात ही भयानक घटना घडली, तेव्हा तो माझ्यासोबत होता. यापुढे मी त्याच्या अस्तित्वावर कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही.”
तसेच पुढे त्यांनी लिहिले की, या शहरातील काही चांगल्या व्यक्तींचे मी आभार मानू इच्छिते. त्या संध्याकाळी मी मदतीसाठी हाक मारताच १० जण माझ्या मदतीला धावून आले. श्रेयस जेव्हा कारमध्ये होता, तेव्ही आपण कोणाची मदत करतोय हे त्या लोकांना माहीत नव्हतं. तरीसुद्धा ते धावून आले.”
सर्वांचे आभार मानताना दीप्ती यांनी लिहिले की, “ज्या ज्या लोकांनी त्या संध्याकाळी माझी मदत केली, ते माझ्यासाठी देवाच्या दूतासारखे आहेत. माझा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी मी आशा करते. मी मनापासून तुमची आभारी आहे. मुंबई या शहराची ही किमया आहे आणि अशाच लोकांमुळे मुंबई बनली आहे. गरजेच्या काळात आम्हाला त्यांनी एकटं सोडलं नाही, आमची काळजी घेतली गेली.”
शेवटी दीप्ती यांनी लिहिले की, “मी माझे मित्रमैत्रिणी, कुटुंबीय आणि फिल्म इंडस्ट्रीचेही आभार मानते. हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतून अनेकांनी काळजी, प्रेम व्यक्त केलं. आपल्या हातातली सर्व कामं सोडून काहीजण माझ्यासोबत तिथे होते. तुम्हा सर्वांमुळे मी एकटी पडले नाही. बेलेव्यू रुग्णालयाच्या टीमचेही मी मनापासून आभार मानते. त्यांनी तातडीने उपचार करून माझ्या पतीचे प्राण वाचवले. सर्व डॉक्टर्स, सिस्टर्स, ब्रदर्स, बॉइज, मावशी, मामा, ॲडमिन आणि सेक्युरिटी या सर्वांचे जितकं आभार मानावं तितकं कमी आहे. श्रेयसच्या सर्व चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली, त्यांच्यासाठीही माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. तुमच्या प्रेमामुळे, प्रार्थनांमुळे आणि आशीर्वादामुळेच आम्ही या कठीण काळावर मात करू शकलो. त्या संध्याकाळी तुम्हा प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून देवाने माझी मदत केली.”
दीप्ती तळपदे यांच्या या पोस्टमुळे अनेकजण भावूक झालेच, शिवाय अनेकांना दिलासा मिळाला असून सर्वांनी श्रेयसला काळजी घेण्याचा सल्लाही दिला.