आज सलमान खानचा ५६ वा वाढदिवस आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याची क्रेझ आजही तितकीच आहे. तब्बल ३ दशकं तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. सलमान हा त्याच्या काळातील एक ट्रेंडसेटर होता आणि आजही चित्रपटसृष्टीत तो ट्रेंडसेटर आहे. असाच एक ट्रेंड सलमानने सेट केला तो म्हणजे शर्टलेस होऊन परफॉर्म करण्याचा. सलमान चित्रपटात असला की एकतरी सीन त्याचा शर्ट काढून बॉडी दाखवणारा असणारच. ही सलमानची स्टाईल आहे, पण तुम्हाला माहितीये का? ही सलमानची स्टाईल त्याने ठरवून केलेली नाही.
सलमानचं शर्ट काढणं ही गोष्ट ठरवून केलेली स्ट्रॅटजी नव्हती. सलमान खानचा ९० च्या दशकातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हा चित्रपट चांगलाच गाजला. सलमानने इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले होतेच मात्र आपल्या भावांसाठी देखील धडपड करायला त्याने सुरवात केली होती. सलमानच्या धाकट्या भावाने दिग्दर्शनात पाऊल ठेवले तर दुसरा भाऊ अरबाजने अभिनयात. या तिन्ही भावांनी पहिल्यांदाच एकत्र या चित्रपटात काम केले होते.
सलमानच्या दमदार एंट्रीसाठी ‘ओ ओ जाने जाना’ हे गाणं तयार करण्यात आलं. निर्मात्यांना हे गाणं अजिबात आवडलेलं नव्हतं. हे गाणं एका वेगळ्याच चित्रपटात वापरणार होते, पण नंतर कोणालाच पसंत पडत नसल्याने सलमानने हे गाणं आपल्या घरच्याच चित्रपटात वापरायचं ठरवलं.
या गाण्याच्या चित्रीकरणासाठी सेटवर सलमानसाठी जे स्लीवलेस टीशर्ट आणले होते त्यापैकी एकही टीशर्ट सलमानला फिट बसत नव्हता. शेवटी भावाने म्हणजेच सोहेलने सलमानला शर्ट न घालताच गाण्याचे चित्रीकरण करण्यास सांगितले. सलमाननेही कुठलाच आडमुठेपणा न करता ते गाणं चित्रित केलं.
या गाण्यानंतर हिरोचा शर्ट काढणे हा नवा ट्रेंड सुरू झाला. सलमानच्याही बहुतेक प्रत्येक चित्रपटात सलमानचा हा ठरलेला सीन घेण्यासाठी निर्माते दिग्दर्शकही आग्रह करू लागले, आणि मग हळूहळू ही गोष्ट खूप कॉमन झाली. आज सलमाचा सिनेमा बघताना त्याचे फॅन्स संपूर्ण चित्रपटापेक्षा तो शर्ट कधी काढतोय याचीच जास्त आतुरतेने वाट बघत असतात हे मात्र अगदी खरं आहे.