आपल्या अभिनयाने हिट सिनेमे देत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवत सुशांत सिंग राजपूतने आपली वेगळी ओळख निर्माण केली. सुशांतचा ऐन उमेदीचा काळ असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्युनंतर अनेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. त्याची आत्महत्या नसून हत्या आहे याबद्दल अनेकांनी आवाज उठवला. आता पुन्हा या प्रकरणाने डोक वर काढले आहे. त्याच्या मृत्यूला २ वर्षे होऊनही मृत्यूबद्दल अजूनही नवीन उलगडे होताना दिसत आहे.
सुरुवातीच्या काळात त्याच्या मृत्यूप्रकरणी झालेल्या तपासात त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. परंतु त्याच्या कुटुंबीयांनी आणि हा तपास चुकीचा आहे असा दावा करत त्याला न्याय मिळावा ही मागणी केली होती. त्यामुळे सुशांतची केस अजूनही संपली नाही.
तर आत्ताच कपूर रुग्णालयाच्या एका कर्मचाऱ्याने एक खळबळजनक दावा केला आहे, त्यामुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा नवे वळण घेतले आहे. सुशांतच्या मृत्यूवेळी कपूर रुग्णालयातील शवागृहात काम करणाऱ्या रुपकुमार शाह यांनी हा दावा केला आहे की, सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याचं झाली होती.
तसेच ते पुढे म्हणाले की, “जेव्हा सुशांत सिंग राजपूतचे निधन झाले, तेव्हा आम्हाला कूपर रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाच मृतदेह मिळाले होते. त्या पाच मृतदेहांपैकी एक मृतदेह व्हीआयपीचा होता. जेव्हा आम्ही पोस्टमार्टम करण्यासाठी गेलो होतो. शवविच्छेदनात आम्हाला कळले की तो सुशांत आहे आणि त्याच्या शरीरावर अनेक खुणा आणि मानेवर दोन ते तीन खुणा आहेत. पोस्टमॉर्टमची नोंद करणे आवश्यक होते परंतु उच्च अधिकार्यांनी केवळ मृतदेहाचे फोटो क्लिक करण्यास सांगितले होते. म्हणून आम्ही तसे केले. जेव्हा मी पहिल्यांदा सुशांतचा मृतदेह पाहिला, तेव्हा मी लगेच माझ्या वरिष्ठांना कळवले की मला वाटते की ही आत्महत्या नसून खून आहे. मी त्यांना सांगितले की आपण नियमानुसार काम करू. तथापि, माझ्या वरिष्ठांनी मला फोटो क्लिक करण्यास सांगितले. शक्य तितक्या लवकर आणि मृतदेह पोलिसांना द्या. म्हणून आम्ही रात्रीच पोस्टमॉर्टम केले. मी डॉक्टरांना सांगितलं होतं की ही सुसाईड केस नसून मर्डर केस आहे. पण त्यावेळी कोणीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही.”
रुपकुमार शाह दीड महिन्यांपूर्वीच निवृत्त झाले आहेत तर त्यानंतर त्यांनी या प्रकरणाबद्दल हा खुलासा केला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार आणि आणखी काय काय समोर येणार याकडे सर्वच नजर ठेऊन आहेत.