अनेक कलाकारांप्रमाणेच अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी यांनी देखील त्यांच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. स्केअर्ड गेम, हाऊसफुल ४, बजरंगी भाईजान, गँग ऑफ वासेपूर यांसारख्या अनेक सिनेमातून त्यांनी आतापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
नवाजुद्दिन सिद्दिकी यांनी आतापर्यंत अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत रईस, सलमान खानसोबत किक आणि आमिर खानसोबत तलाश या सिनेमात काम करत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ५ मे रोजी नवाजुद्दिन सिद्दिकीचा ‘अफवाह’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला.
अफवाह या सिनेमाच्या अपयशाबद्दल जेव्हा त्यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, “चित्रपट बनवल्यावर निर्मात्यांनी तो धैर्याने रिलीज केला पाहिजे. बरेच लोक मला फोन करून विचारत आहेत की, हा चित्रपट कुठे रिलीज होतोय? त्यांना काय सांगू चित्रपट कुठे रिलीज होणार? इंडस्ट्रीतील लोकही मला तेच विचारत आहेत, त्यांना मी काहीही सांगू शकत नाही. आता या चित्रपटाचे चांगले कलेक्शन झाले नाही तर लोक म्हणतील नवाज फ्लॉप अभिनेता आहे. त्यापेक्षा निर्माते हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करू शकले असते.”
तसेच बॉलिवूडमधील मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “बड्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव फारच मनोरंजक आहे. शाहरुख-सलमान असो किंवा आमिर… हे कलाकार जेव्हा त्यांच्याकडे चांगली वा तगडी स्क्रिप्ट असते तेव्हा मला फोन करतात. कारण, ते लोक मला आणि माझ्या कामाला ओळखतात. हे तिन्ही स्टार्स मला वैयक्तिकरीत्या ओळखतात, त्यामुळे माझे त्यांच्याशी असलेले नाते अतिशय घट्ट आहे. एवढे मोठे सुपरस्टार्स माझ्याशी इतक्या विनम्रपणे बोलत असतील, तर त्यांनी नक्कीच मला आपले मानले आहे.”