ऐतिहासिक विषयावरील सिनेमे आठवले की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे निरनिराळे सिनेमे. आणि हे सिनेमाचे म्हणजे प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे महाराजांची भूमिका. मराठी सिनेमांमध्ये एक-दोन वेळा नाही तर तब्बल ६ वेळा महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे ‘चिन्मय मांडलेकर’ (Chinmay Mandlekar). चिन्मयने साकारलेल्या महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. परंतु सध्या मात्र त्याची ही भूमिका आणि त्याच्या मुलाचे नाव म्हणजेच ‘जहांगीर’ या दोन्ही गोष्टींचा संदर्भ लावून चिन्मय आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तर या असह्य ट्रोलिंगमुळे त्रस्त होऊन चिन्मयने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कधीच छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका न साकारण्याचा धक्कादायक निर्णय त्याने घेतला असून, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही घोषणा केली.
व्हिडीओ शेअर करत चिन्मय म्हणाला की, “नमस्कार, माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायाने मी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. काल माझी पत्नी नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ माझ्या मुलाच्या जहांगीर या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलचा आहे. माझ्या कुटुंबाबद्दल अतिशय घाणेरड्या आणि अश्लाघ्य कमेंट्स पास केल्या जात आहेत. माझ्या पत्नीनं व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर देखील लोक कमेंट्स करत आहेत. आता लोकं मुलाच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत. एक व्यक्ती म्हणून मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे.”
“मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर सोशल मीडियावरुन होत असेल तर त्याच्याशी मी बांधील नाही. माझ्या कामावरुन मला वाटेल ते बोलू शकता, तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे, असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं? यावर मी आधाीही बऱ्याच मुलाखतींमध्ये बोललो आहोत. माझ्या पत्नीनेही काल व्हिडीओमध्ये याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे हे मी ते बोलून वेळ वाया घालवत नाही. मला इतकंच सांगायचं आहे की, मी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारतो. मी आतापर्यंत सहा सिनेमांमध्ये मी ही भूमिका केली आहे, तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का आहे? हा ट्रोलर्सचा प्रमुख सूर आहे.”
View this post on Instagram
“माझ्या मुलाचा जन्म २०१३ साली झाला. आज तो ११ वर्षांचा आहे. हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं ते आता होतंय. मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राच्या बाहेरच्या, देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचंही प्रेम दिलं. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशाप्रकारे त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रपणे सांगतो की, इथून पुढे मी ही भूमिका साकारणार नाही. कारण मी करत असलेलं काम, मी केलेली भूमिका, या गोष्टींचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर वडील, नवरा, कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं खूप महत्वाचं आहे. मला याचं खूप वाईट वाटतंय कारण माझ्या मनात महाराजांबद्दल जी भक्ती किंवा श्रद्धा आहे तेच मी भूमिकेतून मांडलं. माझ्या गाडीमध्ये देखील जिथे लोक गणपतीची मूर्ती ठेवतात तिथे महाराजांची मूर्ती आहे. हा दिखावा नाहीये प्रेम आहे आणि श्रद्धा आहे. मी या गोष्टीचं स्पष्टीकर देणार नाही.”
“नाव खटकतंय मग जहांगीर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार का? जहांगीर नावाच्याच एका माणसाला आपल्या देशाने भारतरत्न दिलं. भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (जेआरडी टाटा). टाटांनी उभी केलेली एअर इंडिया ज्यातून आपण अभिमानाने प्रवास करतो, उभे केलेले उद्योग ज्याचा फायदा भारतात प्रत्येक नागरिकाला होतो. त्याचा वापर करताना आपण हा विचार करतो का की याच्या प्रणेत्याचं नाव जहांगीर होतं. त्यांचं टायटनचं घड्याळ, गाड्या असतील ते वापरताना हा विचार करत नाही. पण ठिके मी एक अभिनेता आहे अभिनेते नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात. इथे अजून एक गोष्ट नमूद करु इच्छितो की अनेकांनी म्हटलं की तुम्ही एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला खतपाणी घातलंत म्हणून तुम्हाला हे होणारंच. माझं चॅलेंज आहे की मला दाखवून द्यावं की मी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार केला, प्लॅटफॉर्मवर गेलोय, किंवा कोणत्या नेत्याच्या अधिपत्याखाली वावरलोय असं कधीच नाही झालंय. माझी राजकीय विचारसरणी स्वतंत्र आहे. किंबहुना मी पॉडकास्टमध्येही मी हे नमूद केलं होतं की मी दर निवडणूकीत ठरवून वेगळ्या पक्षाला मतदान करणारा मी एक सुजाण मतदार आहे, पुन्हा स्पष्टीकरण देण्यात अर्थ नाही. महाराजांच्या भूमिकेने मला आतापर्यंत खूप प्रेम दिलं. पण या भूमिकेने जर माझ्या कुटुंबाला, माझ्या ११ वर्षांच्या मुलाला ह्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांची माफी मागून मी जाहीर करतो की इथून पुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही. नमस्कार.”