रसिक प्रेक्षकांना आपल्या दिलखेचक अभिनयाने आणि गोड सुरांनी वेड लावणारी मराठी अभिनेत्री आणि गायिका म्हणजे केतकी माटेगांवकर. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून ती गायन क्षेत्रात कार्यरत आहे.
केतकीने २०१२ मध्ये ‘शाळा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर आरोही, काकस्पर्श, तानी अशा जबरदस्त चित्रपटांत काम केले. पण तिला प्रसिद्धीच्या झोतात घेऊन येणारा चित्रपट म्हणजे ‘टाईमपास’. त्यातील केतकी आणि प्रथमेश परब यांच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.
२०१५ मध्ये आलेल्या टाईमपास २ चित्रपटानंतर ती अभिनय क्षेत्रापासून लांब होती. केतकीने जवळपास ८ वर्षे कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. ती जरी बऱ्याच कालावधीपर्यंत चित्रपटांपासून दूर असली तरी ती गायिका म्हणून कार्यरत होती. तिचे चाहते मात्र तिच्या नवीन चित्रपटांसाठी फारच उत्सुकतेने वाट पाहत होते. पण आज मात्र त्यांची प्रतीक्षा संपली आहे.
केतकीने नुकतंच तिच्या आगामी चित्रपटाबद्दलची बातमी तिच्या सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यानुसार ती मराठी चित्रपटात झळकणार आहे, तर तिच्या या आगाची चित्रपटाचे नाव ‘मीरा’ आहे. मीराचे दिग्दर्शन केदार दिवेकर यांनी केले आहे.
केतकीच्या कमबॅक नंतर केतकीला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.