आजकाल जितका सन्मान बॉलिवूडमधील कलाकारांना मिळतो तितकाच सन्मान युट्युबर्सना देखील मिळतो. गेल्या तीन-चार वर्षांपासून तरुणांमध्ये युट्युबर्सची क्रेझ वाढली आहे. तसेच युट्युबर्सचे प्रमाण देखील वाढले आहे. अनेक युट्युबर्स टेलिव्हिजन विश्वातील सगळ्यात मोठा रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चा देखील भाग होऊन गेले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूडमधील कलाकार देखील त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी युट्युबर्सचा वापर करताना दिसून येत आहेत. भारतात अनेक मोठ-मोठे युट्युबर्स आहेत.
अशातच नुकतीच ‘वेल्थ मॅनेजमेंट’ने भारतातील श्रीमंत युट्युबर्सची यादी जाहीर केली. यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागला आहे तो म्हणजे प्रसिद्ध युट्युबर तन्मय भट्ट याचा. तन्मयची एकूण संपत्ती ही ६६५ कोटी इतकी आहे. ट्वीटरवरून तन्मयची आणि इतर युट्युबर्सची संपत्ती किती आहे, हे जाहीर करण्यात आले. या पोस्टवर तन्मयने एक भन्नाट कमेंट देखील केली आहे. यावर कमेंट करणात तन्मय म्हणाला, “मी तुम्हाला खात्री देतो की हा नंबर अत्यंत खोटा आहे, किमान माझ्यासाठी तरी” आणि पुढे त्याचे हसण्याचे इमोजी टाकले आहेत. त्यामुळे युट्युबर्सच्या यादीत तन्मय हा सगळ्यात जास्त श्रीमंत युट्युबर ठरला आहे.
तन्मय नंतर नंबर लागला आहे टेक्निकल गुरुजी यांचा, त्यांची एकूण संपत्ती ३५६ कोटी इतकी आहे. त्यांनतर तिसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे आपल्या सगळ्यांना लाडका आणि आवडता युट्युबर आणि अभिनेता भुवन बाम. भुवनची एकूण संपत्ती ही १२२ कोटी इतकी आहे. चौथ्या क्रमांकावर आहे रणवीर इलाहाबादिया त्याची एकून संपत्ती ही ५८ कोटी इतकी आहे. आणि पाचव्या क्रमांकावर आहे कॅरी मीनाटी म्हणजेच अजय नगर त्याची एकूण संपत्ती ही ५० कोटी इतकी आहे. यांसारखेच आणखीन काही प्रसिध्द युट्युबर्स देखील आहेत. पण भारतातील टॉपच्या पाच श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
तन्मय भट्ट बद्दल बोलायचं झालं तर, तन्मय हा एक लेखक, विनोदवीर, कॉन्टेन्ट क्रियेटर आणि युट्युबर आहे. त्याने टेलिव्हिजनसाठी देखील लेखन केले आहे. २०१३ साली तन्मय भट्ट, गुरसिमरन खंबा, रोहन जोशी, आणि आशिष शाक्य या सगळ्यांनी मिळून एआयबी म्हणजेच ‘ऑल इंडिया बकचोद’’ या युट्युब चॅनेलची स्थापना केली होती. तन्मयला या चॅनेलमुळे खूप जास्त प्रसिद्धी मिळाली. तन्मय त्याच्या चॅनेलवरून रोस्टिंग करत असतो. मध्यंतरी त्याने सचिन तेंडुलकर, गायिका लता मंगेशकर यांना देखील रोस्ट केले होते, त्यामुळे तन्मयवर सडकून टीका करण्यात आली होती.