मराठी अभिनेता ‘श्रेयस तळपदे’ला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली. श्रेयस मागील काही दिवसांपासून त्याच्या ‘वेलकम टू द जंगल’ या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. काल त्याने दिवसभर शूटिंग केले, तो पूर्णपणे ठीक होता आणि सेट वर संगळ्यांशी हसून- खेळून, मिळून मिसळून बोलत होता.
शूटिंग दरम्यान त्याने थोडे अॅक्शन सिक्वेन्सही शूट केले. मात्र शूटिंग संपवून घरी येताच अचानक ही घटना घडली आहे. त्याने पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी संध्याकाळी शूटिंग संपल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने श्रेयसला त्वरीत अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे.
View this post on Instagram
ही बातमी ऐकताच श्रेयसच्या चाहत्यांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला. श्रेयसचे चाहते त्याच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर श्रेयसच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत पोस्ट शेअर केल्या. श्रेयसच्या सेक्रेटरीने त्याच्या आरोग्याविषयी माहिती दिली. तेव्हा समोर आले की, श्रेयस सध्या ठीक असून त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याचे देखील समोर आले. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून येत्या एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार आहे.
मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये श्रेयसने धमाकेदार भूमिका निभावत चाहत्यांची मन जिंकली आहेत. तसेच मराठीपासून बॉलिवूडपर्यंत श्रेयसने आपल्या ठसकेदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. श्रेयसने दोन दशकांच्या कारकिर्दीत ४५ हून अधिक सिनेमे केले आहेत. त्याने आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. त्याचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. सध्या श्रेयस वेलकम टू जंगल या आगामी सिनेमामध्ये काम करत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अक्षय कुमार, रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लिव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत.
तसेच इकबाल हा त्याचा पहिला सिनेमा असून, ओम शांती ओम या सिनेमात तो शाहरुख खानसह झळकला होता. एवढेच नाही तर पुष्पाच्या हिंदी व्हर्जनला त्याने आवाज देखील दिला. त्यामुळे त्याच्या आवाजाची चर्चा सर्वत्र झाली होती. गोलमाल रिटर्न्स, हाऊसफुल २ आशा अनेक हिट सिनेमांमध्ये श्रेयसने आजवर काम केले. इमर्जन्सी या कंगनाच्या सिनेमात श्रेयस तळपदेने भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली.