सिनेसृष्टीतील पती-पत्नी, भाऊ-बहीण, मायलेक आणि सासू-सून यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यातील एक सासू सूनेची जोडी म्हणजे मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे.
मृणाल कुलकर्णी या मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलाकार म्हणून ओळखल्या जातात. तसेच त्या दिग्दर्शिका देखील आहेत. तर त्यांची सून शिवानी रांगोळे ही उत्तम अभिनेत्री आहे. शिवानी ही ‘बन मस्का’ आणि ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली आहे.
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी हे दोघे यावर्षीच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकले. शिवानी आणि विराजस हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना चांगले ओळखत होते. त्या दोघांची मैत्री खूप छान असल्याने विराजसच्या कुटुंबीयांसोबत शिवानीचं देखील चांगलं नातं झाल होतं.
तर शिवानी कुलकर्ण्यांची सून होण्या आधीपासूनच ती मृणाल कुलकर्णी यांची फार लाडकी आहे. त्या दोघी बहुतांश वेळा अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरीही लावताना दिसतात. लवकरच मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ‘फक्त महिलांसाठी’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. तसेच मृणाल कुलकर्णी याच चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे त्याचं हे गोड नातं आपल्याला रुपेरी पडद्यावर देखील पाहायला मिळणार आहे.
नुकताच शिवानीचा वाढदिवस झाला, त्यानिमित्त सासुबाईंनी सूनेसाठी एक खास पोस्ट लिहित तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मृणाल कुलकर्णी यांनी लिहिले की, “प्रिय शिवानी, तू या घरी आल्यापासून जाणवतंय मुलगी असण्याचं सुख! ‘घरात एक मुलगी असायला हवी‘ म्हणजे काय याचा अर्थ आत्ता कळतोय. लगबग , गडबड ,धांदल , हसण्याच्या लकेरी.
विराजसची मैत्रीण ते आमची सून हा प्रवास तू मस्त पार पाडला आहेस. एक उत्तम अभिनेत्री म्हणून आम्हाला तुझं कौतुक आहेच, पण नात्यांमधला गोडवा टिकवण्यासाठी तू नेहेमीच प्रयत्न करतेस हे विशेष महत्त्वाचे.. दोन्ही आज्या तुझ्यावर जाम खूश आहेत ! आपल्या माणसांवर प्रेम करणे आणि ते योग्य पद्धतीने दाखवता येणे हे खूप महत्त्वाचे असते आणि ते आयुष्यभर करायचे असते हे नेहेमी लक्षात ठेव.”
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, “आता हळूहळू तुझं काम सुरू झालंय…प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात तब्येत सांभाळणं लक्षात ठेव… डाएट चा अतिरेक नको ! सगळं खायचं आणि व्यायाम चुकवायचा नाही ! हे वर्ष अनेकार्थानी इव्हेंटफूल गेलंय.. अशीच यापुढली ही सारी वर्ष मनाजोगती जाऊदे ! हॅप्पी बर्थडे…” या पोस्टमधून त्या दोघींमधील नात्याची सुंदरता जाणवते.