मालिका विश्वातील अनेक कलाकार त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे सोशल मिडियावर चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपासून शर्मिष्ठा राऊत देखील अनेक कारणांमुळे सोशल मिडीयावर चर्चेत आहे.
मन उधाण वाऱ्याचे, जुळून येती रेशीमगाठी, उंच माझा झोका, यांसारख्या अनेक मालिकेतून प्रेक्षकांच्या मनाला हात घालत शर्मिष्ठाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाची एक इनिंग सुरू असताना शर्मिष्ठाने काही दिवसांपूर्वी एक नवी इनिंग सुरु केली आहे. ही नवी इनिंग नक्की कोणती याची माहिती तिने तिच्या सोशल मिडियावर दिली आहे.
उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या शर्मिष्ठाने काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांना आपण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे, अस सांगत आनंदाची बातमी दिली आहे. निर्मिती क्षेत्रात पहिले पाऊल टाकत असताना ती निर्माती म्हणून तिच्या असलेल्या पहिल्या मालिकेचा प्रोमो देखील आऊट झाला आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा’ असं या मालिकेचं नाव असून अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता ऋषी शेलार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करत शर्मिष्ठाने लिहिलं, “आमचं पहिलं बाळ…” तुला शिकवीन चांगलाच धडा”… आत्तापर्यंत अभिनेत्री म्हणून प्रवास सुरुच आहे त्याच बरोबर निर्माती म्हणून नवीन प्रवास मी आणि तेजसने सुरु केला आणि त्यात मोलाची साथ आम्हाला दिली आमच्यावर विश्वास ठेवला झी मराठी आणि मधुगंधा कुलकर्णी ह्यांनी.. अभिनेत्री म्हणून, माणूस म्हणून तुम्ही रासिक प्रेक्षकांनी कायम मला साथ दिली…आता या पुढच्या नवीन प्रवासासाठी तुमचे आशिर्वाद कायम आमच्या सोबत असू दे…”
शर्मिष्ठाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.