बिग बॉस १६ हा आता अंतिम टप्यात येऊन पोहोचला आहे, पुढील काही दिवसातच बिग बॉसचा ग्रॅन्ड फिनाले पार पडणार आहे. या सिझनमध्ये अनेक अवलिया कलाकार आले, त्यापैकी काही कलाकारांनी दमदार कामगिरी करत आपली जागा Top 5 मध्ये निश्चित केली. त्यातील एक सदस्य म्हणजे आपला मराठमोळा शिव ठाकरे. त्याच्या उत्तम खेळाने त्याने आपली जागा Top 5 मध्ये निश्चित केली आहे. घरातील इतर सर्व सदस्यांना मागे टाकत अर्चना गौतम, प्रियांका चौधरी, शालीन भनोत, एम. सी. स्टॅन आणि आपला मराठी माणूस शिव ठाकरे यांनी Top 5 मध्ये स्थान पटकावलं आहे.
शिवने जसं मराठी बिग बॉस गाजवलं होतं, तसेच तो हिंदी बिग बॉस देखील गाजवत आहे. घरात येणारा प्रत्येक पाहुणा शिवचं कौतुक करत आहे. सलमानने देखील कायमच शिवचे कौतुक केले. कलाकारांपासून ते अनेक राजकारणी मंडळींपर्यंत सर्वांनीच शिवचे कौतुक केले आहे. सगळ्यांनी शिवच विनर होणार अस घोषित देखील केले आहे.
‘बिग बॉस 16’च्या नुकत्याच पार पडलेल्या एका भागात शिव ठाकरे आणि प्रियंका चाहर चौधरीने पती-पत्नी म्हणून एक नाटक केलं. या नाटकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. टेलिव्हिजन विश्वात लोकप्रिय असलेला शिव ठाकरे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शिव ठाकरेचा अभिनय सलमानच्या पसंतीस उतरल्याने त्याने त्याला आगामी सिनेमासाठी विचारणा केल्याचे म्हटले जात आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार, शिव ठाकरे चक्क सलमान खानच्या चित्रपटात झळकणार आहे. आगामी काळात सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर 3’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या दोन पैकीच एका चित्रपटात शिवही झळकेल असं बोललं जात आहे. त्या चित्रपटात शिवची महत्वपूर्ण भूमिका असेल. यापैकी नक्की तो कोणत्या चित्रपटात दिसणार आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.