नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही विभागात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयची छाप पाडणारे अभिनेते म्हणजे ‘प्रशांत दामले’ (Prashant Damle).
गेला माधव कुणीकडे, जादू तेरी नजर, साखर खाल्लेला माणूस, सारखं काहीतरी होतंय, एका लग्नाची पुढची गोष्ट, अटी व नियम लागू यांसारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी तमाम रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. त्यामुळे त्यांना मराठी नाटकातील रंगमंचाचा बादशाह असं म्हणायला देखील काही हरकत नाही. त्यांची अनेक नाटकं प्रचंड गाजली आहेत. त्यामुळे आता नाटक आणि प्रशांत दामले हे एक समीकरणचं बनलं आहे. तर आता दामले हे नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष देखील आहेत.
नाटकांमध्ये प्रशांत यांनी त्यांच्या निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका आपण पहिल्या आहेत, आपल्या उत्तम सादारीकरणातून त्यांनी कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं तर कधी त्यांच्यामुळे प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला हाऊसफुलचा बोर्ड लागला तरी त्याच आश्चर्यचकित होण्यासारखे काही नाही. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशांत दामले यांनी रसिक प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले, ते आजही करत आहेत. आत्तापर्यंत प्रशांत दामले यांनी १२,५०० हून अधिक प्रयोग पूर्ण केले आहेत. त्यांच्या या संपूर्ण प्रवासात कायम स्वतःच्या चेहऱ्यावर हसू ठेवत त्यांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर देखील हसू आणले. पडद्यावर जसे ते अनेकदा विनोदी भूमिका साकारत सर्वांना हसवतात तसेच पडद्यामागे खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील ते खूपच विनोदी आहेत.
सोशल मीडियावर देखील ते कायमच सक्रीय असतात. ते त्यांच्या नाटकांचे आणि कामाचे नवनवीन अपडेट्स त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करतात. तसेच जसे ते खऱ्या आयुष्यात आहेत, अगदी तसेच ते सोशल मीडियावरही आहेत. त्यामुळे तिथेही अनेकदा त्यांच्या संबंधित गमती-जमती पाहायला मिळतात. दामलेंनी शेअर केलेल्या पोस्टवर त्यांचे चाहते निरनिराळ्या कमेंट्स करत असतात. तर काही त्यांच्या सोबत कमेंट सेक्शनमध्येच संवाद ही साधतात. अनेकदा त्यांचे चाहते हक्काने त्यांच्यासोबत थट्टा देखील करतात. अशावेळी दामलेदेखील त्यांच्याशी तितकंच दिलखुलासपणे चाहत्यांशी संवाद साधतात.
नाटक पाहायला प्रेक्षकांनी नाट्यगृहाकडे वळावं अशी इच्छा बाळगणाऱ्या दामलेंनी नाटकाच्या तिकिटांसाठी ‘तिकीटालय’ हे ॲप्लिकेशन देखील नुकतेच सुरु केले आहे. या मुळे नाटकाचे तिकीट काढणे हे सिनेमांचं तिकीट काढण्याइतपत सोपे झाले. प्रशांत दामले यांनी आत्ताच आगामी नाटकाच्या प्रयोगाची पोस्ट शेअर करत माहिती दिली. तर त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. या पोस्टवर एका चाहत्याने केलेली एक कमेंट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. तर या कमेंटवर प्रशांत दामले यांनी दिलेलं उत्तर देखील चांगलेच व्हायरल होत आहे. एका चाहत्याने या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, “सर गंमत म्हणून विचारत आहे, अर्ध्या तिकीटात प्रवेश मिळेल का हो?” तर वेळात वेळ काढून प्रशांत दामले यांनी यावर उत्तर देत लिहिले की, “नाटक पण अर्धच बघता येईल.”
दामलेंच्या या मजेशीर उत्तरावर आणखी एका चाहत्याने लिहिले की, “सर तुमच्या सारखा महान कलाकार ज्या नाटकात अभिनय करत असेल ते नाटक अर्धवट पाहणं शक्य तरी आहे का?” तर अशा या नाटकाचे, प्रशांत दामले यांचे आणि चाहत्यांचे सुंदर अन् गमतीशीर क्षण चांगलेच व्हायरल होत आहे.