‘बिग बॉस १७’मध्ये स्पर्धक म्हणून गेलेल्या या बहिणी साठी प्रियांकाची खास पोस्ट
देसी गर्ल म्हणून जरी प्रियांका चोप्राची ओळख असली तरी प्रियांका ही ग्लोबल स्टार आहे. त्यामुळे कायम कोणत्या ना कोणत्या कारणावरून ती प्रचंड चर्चेत असते.
तर आता बिग बॉस शोसोबत तिचे नाव जोडले जात आहे. अवघ्या ३-४ दिवसांपूर्वी हिंदीमधील ‘बिग बॉस’ चे १७ वे पर्व सुरु झाले. अन् पाहता पाहता अगदी पहिल्या दिवसापासूनच या शोने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कधी या शोमध्ये सामील झालेले कलाकार असो वा कपल. यंदाच्या अनोख्या थीमने प्रेक्षकांमध्ये बिग बॉस संबंधित उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
आता बिग बॉस आणि प्रियांका यांचा काय संबंध हा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतू हा संबंध प्रियांका चोप्रासोबत नसून ‘मनारा चोप्रा’शी आहे. मनारा ही बिग बॉसच्या १७ व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. प्रियांका आणि मनारा यांचे खूपच खास नातं आहे. मनारा ही प्रियांकाच्या आत्याची मुलगी आहे. तिने तेलुगू सिनेमांमध्ये अनेकदा काम केले असून ती अभिनेत्री आहेच शिवाय ती फॅशन डिझायनर देखील आहे.
बिग बॉसच्या १७ व्या सिझनमध्ये सहभागी झाल्यामुळे मनाराची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. तर आता नुकतंच लाडक्या बहिणीला शुभेच्छा देण्यासाठी प्रियांकाने एक खास पोस्ट शेअर केली आहे. मनाराला शुभेच्छा देताना प्रियांकाने जुन्या आठवणींना उजाळा देत २००० सालचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा मुकूट दिसत आहे. तर या फोटोसोबत “गुड लक लिटिल वन” असं म्हणत मनाराला शुभेच्छा दिल्या. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.