सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे ऑस्करची. यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास ठरला. या वर्षी भारताला दोन दोन ऑस्कर मिळाले आहेत. ‘द एलिफंट व्हिसपर्स’ या शॉर्ट फिल्मला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ या कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला. याबरोबरच बहुचर्चित एस.एस.राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. ऑस्कर मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे, सोशल मीडियावर प्रेक्षकांपासून मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा याचं कौतुक करत आहेत.
दाक्षिणात्य अभिनेता राम चरण यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ऑस्कर जिंकून परतल्यावर नुकतंच त्याने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचीदेखील भेट घेतली. यानंतर तो इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या मंचावर दिसला. या मंचावर त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. ऑस्करच्या मंचावर त्याने नाटू नाटूवर डान्स का केला नाही असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला होता. यावेळी तो म्हणाला की, त्याला स्वतः या गाण्यावर ऑस्करमध्ये डान्स करायचा होता. मात्र ऑस्कर समितीने त्याच्याशी संपर्क साधला नाही. मात्र तरीही त्या मंचावर त्याचे गाणे सादर झाल्याचा त्याला खूप आनंद आहे.
पुढे त्याला विचारण्यात आले की, भविष्यात कोणती भूमिका साकारायला आवडेल, थोडावेळ विचार करून राम चरण उत्तरला, “एखाद्या खेळाशी निगडीत कोणतीही भूमिका मला साकारायला आवडेल. एखादी स्पोर्ट्स फिल्म करायला मला आवडेल.” राम चरणच्या या उत्तरावर एका व्यक्तीने विराट कोहलीच्या बायोपिकचा पर्याय सुचवला. त्याबद्दल बोलताना राम चरण म्हणाला, “विराट हे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे. मला ही संधी मिळाली तर मला ही भूमिका साकारायला नक्की आवडेल, तसाही मी बराचसा विराटसारखा दिसतो.”
मागील काही दिवसांपूर्वी विराट कोहलीचासुद्धा वानखेडे स्टेडियमवरील ‘नाटू नाटू’ गाण्याची स्टेप करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. सध्या राम चरण त्याच्या ‘आरसी १५’ या चित्रपटावर काम करत आहे. अजून याचं नाव ठरलेलं नाही. हा एक पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. तसेच यात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.