आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख याने एक अनोखी इच्छा व्यक्त केली आहे. नुकताच आलेला रितेश आणि जिनिलियाचा ‘वेड’ सिनेमा प्रेक्षकांनी अगदीच उचलून धरला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७४ कोटींची कमाई केली. या सिनेमातील सत्या आणि श्रावणीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. रितेशने हिंदी बरोबरच मराठीमध्ये देखील आपले नाव कमावले आहे.
नुकतेच ‘झी मराठी चित्रगौरव २०२३’ हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच रितेश आणि जिनिलिया देखील उपस्थित होते. रेड कार्पेटवर रितेशला एक प्रश्न विचारण्यात आला “तू आतापर्यंतच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहेस. पण तुमची कोणती इच्छा आहे की, मला ही भूमिका साकारायची आहे?”
आतापर्यंत रितेशने मराठीत अॅक्शन आणि रोमाँटिक भूमिका साकारली आहे. पण त्याला आता एक वेगळी भूमिका करायची आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना रितेश म्हणाला, मी ‘लयभारी’मध्ये अॅक्शन केली ‘वेड’मध्ये रोमाँटिक भूमिका केली, आता मला मराठी विनोदी भूमिका करायची आहे. हिंदीत मी कॉमेडी रोल केले आहेत. पण मराठीत अजून केले नाही आणि विनोदाचा दर्जा खूप वेगळा आहे. त्यामुळे मला विनोदी भूमिका साकारायची आहे.
”त्याच्या या उत्तरानंतर चाहते आणखीन उत्सुक झाले आहेत. आता रितेश पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एका वेगळ्या भूमिकेत दिसून दिसणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.