बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानने मागील काही वर्षांपासून सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. शाहरुख शेवटचा दिसला तो ‘झिरो’ या चित्रपटात. त्यानंतर तो चित्रपटांपासून दूर होता. परंतु शाहरुखचे चाहते मात्र त्याच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आता चाहत्यांची आतुरता संपली आहे, कारण शाहरुख लवकरच एका धमाकेदार चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि निर्माते आदित्य चोप्रा यांच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटात शाहरुख खान दिसणार आहे. तसेच या चित्रपटात शाहरुखसह सलमान खान आणि दीपिका पदुकोण यांसारखे दिग्गज कलाकार असल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजणार यात शंकाच नाही.
येत्या २ नोव्हेंबर रोजी शाहरुख खानचा वाढदिवस आहे. शाहरुखच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पठाण चित्रपटाचे निर्माते शाहरुखच्या चाहत्यांना एक मोठं गिफ्ट देणार असल्याची बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
अनेकदा शाहरुख त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला जाताना दिसतो. परंतु यंदा तो त्याच्या चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा करणार हे नक्की.
View this post on Instagram
शाहरुखच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना काय गिफ्ट मिळणार याचा अंदाज आता चाहते बांधू लागले आहेत. पठाण चित्रपटाचा टीझर रिलीज केला जाऊ शकतो तसेच पठाण चित्रपटातील शाहरुखच्या भूमिकेचा पहिला लूक पाहायला मिळू शकतो असे अनेक अंदाज चाहते बांधत आहेत. परंतु याबद्दल निर्माते आणि शाहरुख यांनी कोणतीही घोषणा अद्याप केलेली नाही.
त्यामुळे शाहरुखचा यंदाचा वाढदिवस हा फक्त त्याच्यासाठी नाही तर चाहत्यांसाठी सुध्दा स्पेशल असणार हे नक्की.