मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सिध्दार्थ जाधव कायमच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतो. अन् वेगवेगळ्या कारणांनी बराच चर्चेत असतो. सिद्धार्थ सध्या “आता होऊ दे धिंगाणा” या स्टार प्रवाह वाहिनीवरील नवीन शोचे सूत्रसंचालन करत आहे.
कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची घोषणा झाल्यापासून या नवीन पर्वाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव करणार असल्याची बरीच चर्चा रंगली होती. परंतू ‘बिग बॉस मराठी सीझन ४’ चा टीझर काही दिवसांपूर्वीचं प्रदर्शित झाला आणि महेश मांजरेकर हेचं या सीझनचे होस्ट असतील यावर शिक्कामोर्तब झाले.तर आता सिद्धार्थ हा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर सिद्धार्थने ही बिग बॉसच्या घरात जाण्याबद्दल भाष्य केले आहे.
View this post on Instagram
‘बिग बॉस सीझन ४’च्या निमित्ताने महेश मांजरेकर यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी महेश मांजरेकरांना ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुम्हाला कोणते स्पर्धक बघायला आवडतील? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अनेक नावं घेतली आणि त्यातील एक नाव म्हणजे सिद्धार्थ जाधव.
महेश मांजरेकर म्हणाले की,”बिग बॉस मराठी’च्या घरात मला सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, शिवाली परब, नम्रता संभेराव, प्रवीण तरडे या कलाकारांना बघायला नक्कीच आवडेल. हे स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात चांगलाच कल्ला करतील. तसेच ते हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील.”
महेश मांजरेकरांच्या या वक्तव्यावर सिद्धार्थने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा सिद्धार्थ जाधव म्हणाला की,“मी बिग बॉसच्या घरात धिंगाणा घालेन, असं महेश सरांना वाटतं. पण सध्या मी आधीच एक धिंगाणा घालतोय. मांजरेकरांचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी मोलाचा आहे. त्यामुळे जर ते म्हणत असतील तर मला बिग बॉसमध्ये सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.”
असे असूनही बिग बॉस मराठी सीझन ४ मधील स्पर्धकांची नावे आजूनही गुलदस्त्यातच आहेत.