मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) सध्या ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सोनाली वेगवेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. शिवाय प्रमोशनदरम्यान तिने वेस्टर्न लूकमध्ये काही खास फोटोशूट देखील केलं आहे. सोनालीने नुकतंच पोलका डॉट ड्रेस परिधान केला. या ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले. तिथपासूनच तिच्या गरोदरपणाची चर्चा रंगू लागली.
अभिनेत्री अनुष्का शर्मा, नताशा स्टॅन्कोविच, करीना कपूर खान यांसारख्या अभिनेत्रींनी गरोदरपणात पोलका डॉट ड्रेस परिधान केला. अनुष्काने तर हा ड्रेस परिधान करत आपण गरोदर असल्याचं सांगितलं होतं. सोनालीने देखील काळ्या रंगाचा पोलका डॉट ड्रेस परिधान केला आणि अनेकांनी तिला तू गरोदर आहेस का? हा एकच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. आता या सगळ्या चर्चांवर सोनालीने कमेंटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.
सोनालीने काळ्या रंगाच्या पोलका डॉट ड्रेस परिधान केला. या ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले. त्यानंतर तिचे हे फोटो पाहून तू गरोदर आहेस का?, हा ड्रेस तू परिधान केला म्हणजे नक्कीच आनंदाची बातमी आहे, कुणीतरी येणार येणार गं अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. त्यानंतर सोनालीने कमेंट करत म्हटलं की, “जे लोक मला गरोदरपणाबाबत विचारत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की मी गरोदर नाही. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाच्या माध्यमातून मी नुकतंच माझं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पाहा.”
View this post on Instagram
सोनालीच्या या कमेंटनंतर ती गरोदर असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सोनाली तिचं काम सांभाळत पती कुणालला देखील तितकाच वेळ देते. कुणालबरोबर तिने खास फोटोशूट केलं होतं. सध्यातरी सोनाली-कुणाल त्यांचं आयुष्य एण्जॉय करत आहेत.