तुळशीचं लग्न झाल्यावर लगेचच सर्वत्र लग्नाची धामधूम सुरु होते. त्यावेळी चाहते देखील त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत असतात. असेच असंख्य चाहते आपली लाडकी अभिनेत्री म्हणजेच कलरफुल ‘पूजा सावंत’चा (Pooja Sawant) होणारा नवरा कोण असेल हे जाणून घेण्यासाठी आतुर झाले होते.
क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या पहिल्याच सिनेमातून तिने रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. त्यांनतर तिने झकास, सतरंगी रे, पोस्टर बॉईज, दगडी चाळ, चीटर, भेटलीस तू पुन्हा, लपाछपी, वृंदावन, बोनस यांसारख्या अनेक सिनेमांमधून तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला. यातील काही सिनेमांमधील तिच्या भूमिका इतक्या गाजल्या की प्रेक्षक पूजाला त्याच नावाने ओळखू लागले. दगडी चाळ या सिनेमातून पूजाला कलरफुल हे नाव मिळालं हे खरं. तिचं हे नाव आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहे. तर अशी ही कलरफुल पूजा सोशल मिडीयावर देखील तिचे नवे रंग आणि एकूणच खास गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.
कलाकारांच्या प्रेमाच्या अफवा कायम पाहायला मिळतात. तशाच पूजाच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा देखील होत्या. अनेक शो आणि सिनेमांमध्ये लोकप्रिय अभिनेता ‘वैभव तत्ववादी’ आणि पूजा एकत्र झळकले आहेत. तसेच कामाव्यतिरिक्त देखील त्यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यामुळे यापूर्वी वैभव तत्ववादीसोबत अनेकदा पूजाचे नाव जोडले गेले. त्या दोघांनी कोणतेच भाष्य न केल्याने त्यांच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर मागील वर्षी पूजा आणि अभिनेता ‘भूषण प्रधान’चे काही रोमँटिक सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले होते. तेव्हा सुद्धा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतू हे फोटो एका अल्बमसाठी आहेत असं सांगून या चर्चांना पूर्ण विराम दिला होता.
View this post on Instagram
पण आज पुन्हा एकदा पूजाच्या नावाने लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. पण यावेळी त्याचे कारण देखील ती स्वतःच ठरली आहे. पूजाने आज (२८ नोव्हेंबर २०२३ रोजी) तिच्या सोशल मिडियावरून तीन खास पोस्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्या. तीन रोमँटिक फोटो शेअर करत तिने तिच्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली. सफेद रंगातील कपड्यांमध्ये ट्वीनिंग करत तिने तिच्या जोडीदारासोबतचा पहिला फोटो शेअर करत लिहिले की, “Opening my heart to a new chapter with my special one…” तसेच त्यांचा दुसरा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “Here’s to the magic of love and to our beautiful journey ahead…” तर तिसरा फोटो शेअर करत पूजाने लिहिले की, “We are engaged, Stay tuned with us.” यामध्ये पूजाने घातलेली अंगठी खूपच लक्षवेधी ठरली. प्रेमाची कबुली देत पूजाने हे फोटो जरी शेअर केले असले तरी तिचा जोडीदार नक्की आहे तरी कोण? हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.
आयुष्याच्या नव्या वाटेवर चालताना पूजाने जोडलेला नवा धागा आणि ही गोड बातमी ऐकून तिचे चाहते आनंदित झाले आहेत. तसेच या फोटोंवर मराठी सिनेसृष्टीतील सायली संजीव, तेजस्विनी पंडित, सई गोडबोले, भाग्यश्री मोटे, फुलवा खामकर, प्रार्थना बेहरे, पुष्कर जोग, हेमंत ढोमे, विशाल निकम, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ चांदेकर यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट्स करत पूजा आणि तिच्या जोडीदारावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.